*जिल्ह्यातील अपघात रोखण्यासाठी*
*राज्य महामार्गाचे सेफ्टी ऑडिट करा*
*-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.*
· *चारचाकी वाहनांमध्ये पाठीमागील सीटवरही बेल्ट बंधनकारक*
· *जिल्ह्यात एकही 'ब्लॅक स्पॉट' नाही*
· *शहर वाहतुकीचे योग्य नियोजन करणार*
लातूर दि.19 (जिमाका) : जिल्ह्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व राज्य महामार्गाचे 'सेफ्टी ऑडिट' करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश क्षीरसागर, एम. एम. पाटील, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सं. पं. साळुंके, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला, महामार्ग वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक डी. एम. गायकवाड, डायल १०९ प्रकल्पाचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. संदीप राजहंस यावेळी उपस्थित होते.
रस्ते अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून हे अपघात रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. याकरिता जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व राज्य महामार्गांचे सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
चारचाकी गाडीत मागे बसणाऱ्यांनाही सीट बेल्ट बंधनकारक
वाहन अपघातांमध्ये होणारे मृत्यू रोखण्यासाठी चारचाकी प्रवाशी वाहनांमध्ये पाठीमागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांनीही सीट बेल्टचा वापर करणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस आणि परिवहन विभागाने दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या तसेच रस्ते अपघातांचे प्रमाण अधिक असलेल्या पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करावी. तसेच वळण रस्ते, अपघात प्रवण क्षेत्र याठिकाणी सूचना फलक लावावेत, अशा सूचना दिल्या.
जिल्ह्यात एकही 'ब्लॅक स्पॉट' नाही
गेल्या तीन वर्षांमध्ये जिल्ह्यातील कोणत्याही मार्गावर ५०० मीटरच्या आतील अंतरावर ५ अपघात किंवा अपघातात १० व्यक्तींचा मृत्यू झालेला नसल्याने जिल्ह्यात एकही 'ब्लॅक स्पॉट' नसल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी दिली. जिल्ह्यासाठी ही समाधानाची बाब असून जिल्ह्यातील रस्ते अपघात रोखणे व वाहतुकीला शिस्त लावण्यास प्राधान्य देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी यावेळी सूचित केले.
सध्या दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी बसच्या तिकीट दरात अतिरिक्त वाढ करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने परिवहन विभागाने अचानक भेटी देऊन खासगी बस तिकीट दरांची तपासणी करावी. तसेच याविषयीच्या तक्रारींकरिता जिल्हास्तरीय हेल्पलाईन क्रमांक सर्व खासगी बस कार्यालये व वृत्तपत्रात प्रसिद्ध करावा, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी उपाययोजना, सिग्नल व्यवस्था, पार्किंग सुविधा याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली असून त्यात ज्या सुधारणा करावयाच्या आहेत, त्याबाबतही संबंधित विभागांना जिल्हाधिकारी यांनी यावेळी अवगत करून दिले.
****
Comments
Post a Comment