सुदृढ आरोग्यासाठी जंतनाशक गोळी ही संजीवनीच -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

सुदृढ आरोग्यासाठी जंतनाशक गोळी ही संजीवनीच

                          -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

*येत्या 17 ऑक्टोबर रोजी 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुले व मुलींना जंतनाशक मोहिमेतंर्गत जंत* *नाशक गोळी खावू घालण्यात येणार*

                *लातूर, दि.6(जिमाका) *:- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम वर्षातून 2 वेळा राबविण्यात येते. चालू वर्षामध्ये ही मोहिम संस्थास्तरावर (शाळा व अंगवाडी) दि. 10 ऑक्टोबर, 2022 रोजी राबविण्यात येणार आहे. व दिनांक 17 ऑक्टोंबर,2022 रोजी उर्वरीत लाभार्थींना जंतनाशक गोळया देण्यासाठी मॉपअप दिन आयोजित केला जाणार आहे. शाळाबाह्य, शाळेत न जाणारे व सामाजीक स्तरावरील बालकांसाठी गृहभेटीव्दारे आशांमार्फत ही मोहिम सामाजिक स्तरावर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुले व मुलींना जंतनाशक मोहिमे अंतर्गत जंतनाशक गोळी खाऊ घालण्यात येणार आहे.

                          आतड्यांमधील कृमी दोष हा बालकांमध्ये व किशोरवयीन मुला मुलींमध्ये होणाऱ्या रक्तक्षय व कुपोषणास जबाबदार आहे. यामुळे मुला मुलींच्या शिक्षणावर व पुढील आयुष्यातील आरोग्य, शारिरिक व मानसिक विकासावर विपरीत परिणाम होतात. यामध्ये तीव्र प्रमाणात कृमी दोष असलेले विद्यार्थी लवकर आजारी पडतात. तसेच त्यांना लवकर थकवा येतो. व अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत होत नाही. त्यामुळे शाळेतील अनुपस्थितीचे प्रमाण वाढते. आतड्यांमधील कृमी दोष हे वैयक्तीक व परिसर अस्वच्छतेमुळे होतात. बालकांमध्ये याचा प्रसार दुषीत मातीव्दारे, अस्वच्छ हात असल्यामुळे तसेच अस्वच्छ फळे, भाज्या व अन्न यामुळे फार सहजतेने होतो. शाळा व अंगणवाडी पातळीवरुन देण्यात येणारी जंतनाशक गोळी ही यावर फार परिणामकारक आहे.या मोहिमेचा उद्देश 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुले व मुली यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे.

                          जिल्हा व तालुका स्तरावर आरोग्य, शिक्षण व एकात्मिक बाल विकास विभाग या 3 मुख्य विभागांच्या समन्वयाने जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील 4 लाख 79 हजार 920 व शहरी भागातील  1 लाख 11 हजार 586 असे एकूण 5 लाख 91 हजार 506 लाभार्थींना जंतनाशक गोळया खावू घालण्याकरिता नियोजन करण्यात आलेले आहे.

                          दि. 3 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये वरील कालावधीत नागरिकांनी आपल्या परिवारातील 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुले व मुली यांना न चुकता शाळा व अंगणवाडी येथे जंतनाशक गोळी खाऊ घालावी. तसेच हात स्वच्छ धुवावेत, शौचालयाचा नियमित वापर करावा. पायात चपला, बूट घालावेत, निर्जंतूक व स्वच्छ पाणी प्यावे,व्यस्थित शिजवलेले अन्न खावे, निर्जंतूक व स्वच्छ पाण्यात भाज्या व फळे धुवावीत, नखे नियमित कापावीत व स्वच्छ ठेवावीत याव्दारे जंतुसंसर्ग थांबविता येईल. आणि त्यांचे आरोग्य अबाधीत राहील असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मणराव देशमुख, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतिष हरिदास यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा