लातूर जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध • दावे व हरकती नोंदवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
लातूर जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
• दावे व हरकती नोंदवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
लातूर, दि. ३१ : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ (एसआयआर) अंतर्गत लातूर जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार नोंदणी नियम, १९६० नुसार तयार करण्यात आलेली ही प्रारूप यादी सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि मतदान केंद्रांवर कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून जिल्ह्याच्या https://latur.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या प्रारूप मतदार यादीनुसार लातूर जिल्ह्यातील २ हजार १४७ मतदान केंद्रांवर एकूण १७ लाख ९० हजार ००८ मतदारांची नोंदणी झालेली आहे. यामध्ये ९ लाख ४० हजार २०० पुरुष, ८ लाख ४९ हजार ७७८ महिला आणि ३० इतर मतदारांचा समावेश आहे.
मतदारसंघनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
• २३४-लातूर ग्रामीण: ३६३ मतदान केंद्रांवर १ लाख ५७ हजार २६८ पुरुष, १ लाख ३८ हजार ७९७ महिला व १ इतर असे एकूण २ लाख ९६ हजार ०६६ मतदार आहेत.
• २३५-लातूर शहर: ३८९ मतदान केंद्रांवर १ लाख ७२ हजार ९३२ पुरुष, १ लाख ६४ हजार ८६९ महिला व १५ इतर असे एकूण ३ लाख ३७ हजार ८१६ मतदार आहेत.
• २३६-अहमदपूर: ३७६ मतदान केंद्रांवर १ लाख ६२ हजार ४२२ पुरुष, १ लाख ४५ हजार ४२३ महिला व १ इतर असे एकूण ३ लाख ०७ हजार ८४६ मतदार आहेत.
• २३७-उदगीर: ३६० मतदान केंद्रांवर १ लाख ४९ हजार ९७९ पुरुष, १ लाख ३७ हजार २०९ महिला व ८ इतर असे एकूण २ लाख ८७ हजार १९६ मतदार आहेत.
• २३८-निलंगा: ३४७ मतदान केंद्रांवर १ लाख ५३ हजार ६३६ पुरुष, १ लाख ३७ हजार ४५८ महिला व ३ इतर असे एकूण २ लाख ९१ हजार ०९७ मतदार आहेत.
• २३९-औसा: ३१२ मतदान केंद्रांवर १ लाख ४३ हजार ९६३ पुरुष, १ लाख २६ हजार ०२२ महिला व २ इतर असे एकूण २ लाख ६९ हजार ९८७ मतदार आहेत.
त्रुटी दुरुस्तीसाठी सुनावणी आणि नोटीस प्रक्रिया
प्रारूप मतदार यादीच्या पाहणीदरम्यान संपूर्ण जिल्ह्यामध्ये नो-मॅपिंग असलेले ६८ हजार ७४४ मतदार आणि वय, नाव किंवा नातेसंबंधात विसंगती असलेले १ लाख ५६ हजार ५५९ मतदार आढळून आले आहेत. या मतदारांना आवश्यक पुरावे सादर करून दुरुस्ती करण्याची संधी देण्यात येणार असून, संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत ३१ ऑगस्ट २०२६ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सुनावणीच्या नोटीसा बजावण्यात येतील. नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी सुनावणीच्या वेळी उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, जेणेकरून अंतिम मतदार यादीत त्यांचे नाव कायम राहील, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांचे गणक प्रपत्र प्राप्त झाले नाहीत, त्यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि राजकीय पक्षांचे बीएलओ सहाय्यक यांच्यामार्फत पडताळणी करून २ लाख १४ हजार ४४२ मतदारांच्या प्रपत्रांवर 'Uncollectable' असा शेरा मारण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यात एकूण ५१ हजार ७४५ मयत, १८ हजार ६१३ गैरहजर, १ लाख १८ हजार २१२ स्थलांतरीत, ४७० इतर आणि २५ हजार ४०२ इतर ठिकाणी नोंदणीकृत असलेल्या मतदारांचा समावेश आहे. यामध्ये लातूर ग्रामीण ३४ हजार ४९२; लातूर शहर ४५ हजार ६६२; अहमदपूर ३४ हजार १४५; उदगीर ३३ हजार ५२०; निलंगा ३७ हजार २८८ आणि औसा २९ हजार ३३५ मतदारांचा समावेश आहे.
दावे, हरकती व नवीन नोंदणीची प्रक्रिया
या मतदार यादीसाठी अर्हता दिनांक १ ऑक्टोबर २०२६ निश्चित करण्यात आलेला आहे. प्रारूप यादीत नाव समाविष्ट करणे, आक्षेप नोंदवणे किंवा तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी आवश्यकतेनुसार फॉर्म ६, ७ किंवा ८ मध्ये आपले दावे सादर करावेत. तसेच, १ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व पात्र नागरिकांना फॉर्म-६ भरून आगाऊ दावा दाखल करता येईल, ज्यावर संबंधित तिमाहीतील अर्हता दिनांकानुसार विचार केला जाईल. हे सर्व अर्ज व हरकती मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे समक्ष अथवा टपालाने पाठवता येतील.
संबंधित मतदार नोंदणी अधिकारी व कार्यालये:
१. २३४-लातूर ग्रामीण: उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर.
२. २३५-लातूर शहर: उपविभागीय अधिकारी कार्यालय, लातूर.
३. २३६-अहमदपूर: उपविभागीय अधिकारी कार्यालय, अहमदपूर.
४. २३७-उदगीर: उपविभागीय अधिकारी कार्यालय, उदगीर.
५. २३८-निलंगा: उपविभागीय अधिकारी कार्यालय, निलंगा.
६. २३९-औसा: उपविभागीय अधिकारी कार्यालय, औसा-रेणापूर.
जर नागरिक किंवा मतदार, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निर्णयावर असमाधानी असतील, तर त्यांना आदेशाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, लातूर यांच्याकडे अपील दाखल करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
**
Comments
Post a Comment