जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकअदालतीत 2 हजार 34 प्रकरणे तडजोडीने निकाली

 

*जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकअदालतीत*

*2 हजार 34 प्रकरणे तडजोडीने निकाली*

 

            *लातूर दि.13 (जिमाका):-* राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर व जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर येथे प्रलंबित व वादपुर्व प्रकरणांचे राष्ट्रीय लोकआदलतीचे आयोजन, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्या. सुरेखा कोसमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

            दि. 12 मार्च 2022 रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये लातूर जिल्ह्यात एकुण 2 हजार 34 प्रकरणात तडजोड झाली. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात, कौटुंबिक, भुसंपादन व तडजोड युक्त दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. तसेच वादपुर्व प्रकरणामध्ये ग्रामपंचायत कर वसुली, सर्व एस. बी. आय. बॅंक, भारत संचार निगम लिमिटेड, टी. व्ही. एस क्रेडीट सर्व्हिस कंपनी, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी, बॅक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक, बॅक ऑफ बडोदा, युको बॅक, आय.सी.आय.सी.आय बॅक, यु.बी.आय., एम.जी. बॅंक, बॅंक आफ बडोदा, बॅक आफ महाराष्ट्र, पंजाब नॅशलन बॅंक, आय.डी.बी.आय.बॅक, कॅनरा बॅंक, दिनदयाल नागरी पतसंस्था, महिंद्रा फायनान्स कं., महिंद्रा ट्रान्सपोर्ट फायनान्स कं., महिंद्रा होम फायनान्स, उज्जैन स्मॉल फायनान्स बॅंक, एयु स्मॉल फायनान्स बॅंक, जना स्मॉल फायनान्स बॅंक, इंडियन ओव्हरसिज बॅंक, चोला व ई-चलन रहदारी वादपुर्व प्रकरणे  ठेवण्यात आली.

            जागतिक महिला दिनानिमित्त एक स्वतंत्र महिला पॅनल उभारण्यात आले होते. या पॅनलवर न्या. सुरेखा कोसमकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पॅनल प्रमुख म्हणुन व अॅड. के. व्ही. पाटील आणि अॅड. छाया अकाते यांनी पॅनल पंच म्हणून काम पाहिले. विशेष बाब म्हणजे लोक अदालतीमध्ये प्रथमच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहीले आणि पक्षकाराची पुन्हा  एकदा  संसारवेल  आनंदाने  फुलवली.

 संसार  म्हणजे दोन अनोळखी माणसांनी आयुष्यभर सोबत करावयाचा प्रवास. या प्रवासात कधी सुख येते, तर कधी दुख येत असतात. तरी देखील एकमेकांना सोबत करायची..! कधी – कधी या संसारात छोट्या  -छोट्या गोष्टीवरुन खटके उडतात. दुरावा निर्माण होतो. मात्र, आजच्या लोक अदालत आयोजनाची यशस्वी फलश्रुती लातूर येथे पहावयास मिळाली. दुरावा आलेल्या जोडप्याने समजुतीने पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला व त्यांची पुन्हा एकदा संसारवेल बहरली गेली. यामुळे  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पॅनल प्रमुख न्या. सुरेखा कोसमकर, यांनी या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातील सौ. विना शिवाजी खोत व शिवाजी मोहन खोत या जोडप्यांचा यथोचित सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

            तसेच लातूर कौटुंबिक न्यायालयाचे न्या. मोहम्मद ए. वाय. एच. यांच्या पॅनलवर एका 85 वर्षाच्या वृध्द पक्षकाराचे दिवाणी स्वरुपाचे प्रकरण होते. यावेळी त्या वृध्द पक्षकाराची बाजू ऐकण्यासाठी न्या. मोहम्मद ए. वाय. एच. हे स्वतः पॅनलवरुन उतरुन दुसऱ्या मजल्यावरुन खाली आले आणि त्या वृध्द पक्षकाराची बाजू ऐकून घेतली. यातून त्यांनी माणूसकीचे दर्शन घडवले.

            दि. 12 मार्च, 2022 रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये लातूर जिल्ह्यात एकुण 2 हजार 34 प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती एस.डी. अवसेकर, यांनी दिली आहे.

या लोकअदालतीला पक्षकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लोकअदालतीचे पॅनेल जिल्हा न्यायालयातील तीन इमारतीत, जिल्हा विधीज्ञ संघ, लातूर तसेच न्यायालयाच्या परिसर येथे विभागण्यात आले होते.

             लोकअदालतीसाठी जिल्ह्यातून एकूण (35) पॅनलद्वारे कामकाज पार पाडण्यात आले. यात लातूर तालुक्यातील पॅनलवर लातूर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. श्रीमती सुरेखा कोसमकर, न्या. डी. पी. रागीट, न्या. के. एस. तोतला, न्या. जे. एम. दळवी, न्या. मोहम्मद ए.वाय.एच., न्या. जी. आर. ढेपे असे जिल्हा न्यायाधीश, न्या. के. एम. कायंगुडे, न्या. एस. एन. भोसले, न्या. व्ही. बी. गुळवे – पाटील, न्या. ए. एस. आलेवार, न्या. पी. एस. चांदगुडे असे दिवाणी न्यायाधीश व. स्तर, न्या. श्रीमती ए. ए. पुंड,  न्या. व्ही. एस. शिंदे, न्या. श्रीमती ए.एम. शिंदे, न्या. श्रीमती एस.सी. निर्मले, न्या. श्रीमती यु. ए. भोसले, असे दिवाणी न्यायाधीश, क.स्तर यांनी पॅनल प्रमुख म्हणुन कामकाज पाहिले.

            तसेच या लोकअदालतमध्ये पॅनलवर अॅड. के. व्ही. पाटील, अॅड. सी. एस. अकाते, अॅड. प्रतिभा कुलकर्णी, अॅड. ह्यदयनाथ डांगे, अॅड. ए. एस. जोशी, अॅड. एन. पी. गायकवाड,  अॅड. स्वाती केंद्रे,  अॅड. आर. के. चव्हाण, अॅड. ज्ञानेश्वर जाधव, अॅड. एम. ए. काझी, अॅड. आर. पी. कुचमे, अॅड. अमोल पोतदार, अॅड. एस. पी. बायस, अॅड. रेश्मा सय्यद, अॅड. वैशाली विरकर, अॅड. एस. जी. केंद्रे, अॅड. रेहाना तांबोळी, अॅड. यु. एन. राऊत, अॅड. शिल्पा शहादतपूरी, अॅड. सुधाकर अरसुडे,  अॅड. संतोष वाघमारे, अॅड. एस. पी. फड, अॅड. बी. व्ही. कांबळे, अॅड. उदय दाभाडे, अॅड. सरिता मोरे, अॅड. ए. आर. वाघमारे यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले.

            लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती एस.डी. अवसेकर, सर्व न्यायाधीश, बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा सदस्य अॅड. आण्णाराव पाटील, अॅड. एस.व्ही. देशपांडे, जिल्हा सरकारी वकिल, लातूर, जिल्हा वकिल मंडळाचे अध्यक्ष अॅड.आर.डी.काळे, न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





*****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत