बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
बचतगटांच्या
माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण
-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
• ग्रामविकास
विभागाच्या ‘महाजीविका अभियाना’चा राज्यस्तरीय शुभांरभ
मुंबई,
दि. 8 : महिलांना गरीबीतून बाहेर काढण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून
बांधणी करून त्यांच्या सक्षमीकरणाचे काम शासनाने हाती घेतले आहे. आता महिला बचतगटाच्या
माध्यमातून पुढे येत असल्याने देश प्रगतीपथावर जोमाने वाटचाल करीत असल्याचे गौरवोद्गार
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
ग्रामविकास
व पंचायत राज विभागाच्या उमेद अभियानमार्फत
‘महाजीविका अभियान’ राज्यस्तरीय
शुभारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,
मुंबई येथे करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास
व पंचायत राज विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर,
गृहनिर्माण (ग्रामीण)चे संचालक डॉ.राजाराम दिघे, अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांच्यासह
राज्याच्या विविध भागातून आलेल्या बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
ग्रामविकास
मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
देऊन सन 2022-23 हे उपजीविका वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामध्ये
उपजीविका व विपणन या विषयावर भर देण्यासाठी महाजीविका अभियानाचा शुभारंभ झाला असल्याचेही
सांगितले.
ग्रामविकास
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आज महिला आरक्षण असल्याने
त्यांची प्रगती दिसून येते. महिलांचा सर्व क्षेत्रात सहभाग वाढविल्यास आपला देश महासत्ता
होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामामुळेच महिला चूल आणि मुलांसह पुरूषांच्या खांद्याला
खांदा लाऊन कार्य करत आहेत. ग्रामविकासामध्ये महिलांचा विकास हा महत्त्वाचा विषय असून
यासाठी महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीयदृष्ट्या सक्षम करण्याची
गरज असल्याचे श्री.मुश्रीफ यांनी सांगितले.
ग्रामविकास
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आजमितीस राज्यातील जवळपास 56 लाख कुटुंबे या अभियानात
सहभागी असून सुमारे 5 लाख 47 हजार स्वयंसहाय्यता गटांची निर्मिती करण्यात आली आहे.
या स्वयंसहाय्यता गटांना आतापर्यंत 12,479 कोटी रूपयांची बॅंक कर्जे आणि अभियानामार्फत
953 कोटी रूपयांचा समुदाय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोविड काळात उमेद अभियानातील
महिलांनी पुढाकार घेऊन मास्क निर्मितीच्या विक्रीतून 11.25 कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल
केली आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत 15 कोटी रूपयांचे
बीजभांडवल वितरीत केले असून लवकरच 13 कोटी रूपयांचे वितरण करण्यात येणार आहे. मा.बाळासाहेब
ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत 4 उपप्रकल्प मंजूर असून त्याची
किंमत 4.15 कोटी रूपये आहे. याशिवाय 200 उपप्रकल्पाचे उद्दिष्ट असून 300 महिला शेतकरी
उत्पादक कंपन्या निर्मितीचे उदिष्ट आहे. आता
या महाजीविका अभियानातून महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देऊन राज्यातील किमान
दहा लाख महिलांना उपजीविका साधने उपलब्ध करून देण्याचे प्राथमिक उद्दिष्ट या अभियानात
नक्की केले आहे. अभियान रचनेत काही त्रुटी असल्यास त्या दूर करून सर्व बचत गटांच्या
महिलांचे जीवन सुखी व संपन्न करू या, असे श्री.मुश्रीफ यावेळी म्हणाले.
राज्यमंत्री
अब्दुल सत्तार म्हणाले की, महिला बचतगटामार्फत महिलांनी तयार केलेली उत्पादने त्यांच्याच
गावात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली तर त्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी मदत होईल. बचतगटाच्या
महिलांना त्या गावातील जिल्हा परिषदेची शाळा दीड दिवसाकरिता उपलब्ध करून देण्यात यावी.
ग्रामविकास आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाने एकत्रित निर्णय घेऊन महिला बचत
गटांना काही कामे दिल्यास बचत गटांना त्यांचा नक्की फायदा होईल. ग्रामीण भागात राहणाऱ्या
महिलांकडे विशेष कौशल्य असल्याने या कौशल्यांना बचत गटामार्फत चालना देण्याची गरज राज्यमंत्री
श्री.सत्तार यांनी व्यक्त केली.
अपर मुख्य
सचिव राजेशकुमार म्हणाले की, महाराष्ट्र हे महिला धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य
असून महिला अधिकारासाठी महाराष्ट्र नेहमी पुढे राहिला आहे. सन 2012 मध्ये उमेदची स्थापना
झाली आणि उमेदची झेप पाहता अन्य राज्येही त्याचे अनुकरण करत आहेत. बचतगटांना आत्मनिर्भर
करण्यासाठी या बचत गटांचे हॉटेल उद्योगासोबत समन्वयन होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या
बचतगटांनी आपल्या गावाची गरज लक्षात घेऊन तीच उत्पादने तयार करावीत. त्या उत्पादित
मालाचे ब्रॅंडींग आणि पॅकेजिंग करण्यात बचत गटाचा सहभाग राहिल्यास बचत गट नक्कीच आत्मनिर्भर
होईल, असे मत राजेशकुमार यांनी यावेळी व्यक्त केले.
उमेदचे
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर म्हणाले की, कोरोनाच्या कठीण काळात राज्यातील
महिला बचतगटांच्या भगिनींनी भूषणावह कामगिरी केली. या महिलांना अधिक प्रोत्साहनासाठी
त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी उमेदच्या वतीने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची
निर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी
अमेझॉन, फि्लपकॉर्ट असे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचबरोबर
उमेदमार्फत एक पोर्टल तयार करण्यात येत असल्याचे डॉ.वसेकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महाजीविका अभियान संकल्पना आणि यातील
उपक्रम व कार्यपद्धती काय असेल याबद्दल सविस्तर सादरीकरण अतिरिक्त संचालक परमेश्वर
राऊत यांनी केले.
या महाजीविका अभियान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मानसी सोनटक्के यांनी केले. ग्रामविकास विभागाचे अवर सचिव धनवंत माळी यांनी आभार मानले.
000
Comments
Post a Comment