पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील विविध विभागाचा आढावा जिल्ह्यात फळबाग लागवडीला अधिक प्रोत्साहन द्यावं, त्याच्या जनजागृतीसाठी कार्यशाळा घ्यावी - पालकमंत्री अमित देशमुख

 

पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील विविध विभागाचा आढावा

जिल्ह्यात फळबाग लागवडीला अधिक प्रोत्साहन द्यावं, त्याच्या जनजागृतीसाठी कार्यशाळा घ्यावी

      -  पालकमंत्री अमित देशमुख

गरजू पर्यंत रेशन कार्ड पोहचविण्यासाठी जिल्ह्यात मोहिम हाती घ्या,रेशनिंग दुकानांना अचानक भेटी द्या

जागा नसल्यामुळे शहरात रमाई आवास योजनेचा लाभ मिळाला नाही अशा लोकांचा आढावा घ्यावा

      लातूर दि.28 ( जिमाका ) जिल्ह्यात फळबाग लागवडीला नरेगा मधून अनुदान मिळत असल्यामुळे ती योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून ती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत गेली पाहिजे त्यासाठी कार्यशाळा घेऊन महत्व पटवून द्यावे अशा सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.

  जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्र्यांनी विविध विभागाचा आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यात ते बोलत होते.

         यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

           रमाई आवास योजना ही अत्यंत महत्वाची योजना असून या योजनेतून गरिबांना पक्की घरे बांधण्यासाठी शासन निधी देते,लातूर जिल्ह्यात या योजनेची स्थिती काय आहे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जाणून घेतली. ग्रामीण भागात रमाई योजनेंतर्गत उत्तम काम सुरु असून निधीची कमतरता नाही मात्र शहरी भागात जागेच्या प्रश्नामुळे अनेक प्रकरण प्रलंबित आहेत, अशा जागा नसलेल्या लोकांचा सर्व्हे करून यादी तयार करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री यांनी दिल्या.

       वन नेशन वन रेशनकार्ड या योजनेची प्रभावी अमंलबजावनी करावी. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटना आणि प्रशासन यांनी या संदर्भाने पूढाकार घेऊन कोणतीही व्यक्ती लाभापासून वंचीत राहू नये याची दक्षता घ्यावी असे निर्देश दिले.

           पुरवठा विभागाशी संबंधित सर्व समित्यांचे गठन करावे, रेशन दुकानातून इतर वस्तू उपलब्ध होण्या बाबतचा अभ्यास करून कार्यवाही करावी, पूरवठा विभागाने गोडावून व इतर ठिकाणी राबवलेली सिसीटीव्ही योजना राज्यात आदर्श ठरली आहे. या विभागाने असेच चांगले काम करावे सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल.

          जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक कामे करता येतात, अशा विभागाचा आढावा घेताना फळबाग लागवड, वन विभाग आणि सार्वजनिक वन विभाग यांच्याकडून फक्त रोप वाटीका न करता अधिकाधिक वृक्षारोपण रस्ते, नाले, नद्याच्या दूतर्फा कसे करता येईल हे पाहावे अशा सूचना केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अधिकाधिक गावातील शेत रस्ते, शिव रस्ते, मातीकाम, गिट्टी काम करून घेण्याच्या सूचना केल्या.

         शासनाकडून गायगोठे अनुदान दिले जाते. मात्र त्यातून शेतकऱ्यांना पूरक असलेला दूध व्यवसाय वाढला पाहिजे याकडे लक्ष द्यावे. गावागावातल्या शाळे मध्ये आपण स्वच्छतागृह बांधतो पण त्याचे योग्य ती देखभाल होत नाही. त्या स्वच्छतेबद्दल काय व्यवस्था करता येईल हे पाहण्याची गरज असल्याचे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

          रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज असून त्यासाठी ज्या जिल्ह्यात हा उद्योग वाढला आहे त्या कर्नाटकातील रामनगरम या जिल्ह्याचा अभ्यास करण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला देऊन रेणापूर येथील शेतकऱ्याचे रेशीम सर्वाधिक भावाने विकले जात असल्याचा बाबतचे कौतुकही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

 


0000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत