एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 मनुष्यबळ विकास कार्यक्रम शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण दौरा संपन्न
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
सन 2021-22
मनुष्यबळ विकास कार्यक्रम शेतकरी
प्रक्षेत्र प्रशिक्षण दौरा संपन्न
लातूर
दि.30(जिमाका):- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२१-२२ मनुष्यबळ
विकास कार्यक्रम अंतर्गत लातूर उपविभागातील शेतक-यांसाठी प्रक्षेत्र प्रशिक्षणाचे आयोजन
दिनांक 22 ते 25 मार्च 2022 या कालावधीत करण्यात आले होते. शेतकऱ्याची निवड सोडत पध्दतीने
तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली होती. या प्रक्षेत्र प्रशिक्षणासाठी लातूर तालूक्यातून
15, औसा तालुक्यातुन-9, निलंगा तालूक्यातुन-12, रेणापुर तालूक्यातुन-18 आणि शिरूर अनंतपाळ
तालूक्यातून-4 असे एकुण 58 शेतकरी सहभागी झाले होते. असे उपविभागीय कृषि अधिकारी लातूर
यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
दिनांक 22 मार्च 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, उप विभागीय कृषि अधिकारी आर.एस.कदम यांचे
हस्ते हिरवा झेंडा दाखवून शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी
रवाना करण्यात आले होते. या दौऱ्यामध्ये सर्वप्रथम दिनांक 22 मार्च 2022 रोजी सोलापूर
येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रास भेट देवून डाळींब पिकाची सुधारीत लागवड पध्दती
ते विक्री व्यवस्था या बद्दल सविस्तर माहिती घेतली. दिनांक 23 मार्च 2022 रोजी कृषि
विज्ञान केंद्र, बारामती येथे माती विना शेती, शेडनेट मधील भाजीपाला लागवड, मत्स पालन,
भाजीपाला रोपवाटिका, ड्रागन फुट, आंबा व पेरू लागवड इ. प्रकल्पास भेट देऊन शास्त्रज्ञाकडून
मार्गदर्शन घेतले तसेच कुकूटपालन व गांडुळखत युनिट प्रकल्पास भेट दिली. दिनांक 24 मार्च 2022 मौशी जि. पुणे येथील किसान कृषि प्रदर्शनास
भेट देवून आधुनिक कृषि अवजारे, शेडनेट, पॉली हाऊस , ठिबक, तुषार कंपन्याच्या स्टॉलला
भेट देवून मार्गदर्शन घेतले. त्यानंतर राजगुरुनगर येथील राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन
केंद्रास भेट देवून कांदा व लसून पिकाच्या अधुनिक साठवण पध्दतीने व लागवड याबाबत तज्ञाचे
मार्गदर्शन घेतले.
दिनांक 25 मार्च 2022 रोजी तळेगाव दाभाडे
येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान केंद्रास भेट देवून
शेडनेट व पॉली हाऊस उभारणी तसेच त्यामधील फुलशेती व भाजीपाला
लागवडीचे अर्थशास्त्र जाणून घेतले. त्यानंतर कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वर ता. राहता
जि. नगर येथे भेट देवून आंबा फळबाग लागवड, स्पेरोलिना प्रकल्पास भेट देवून माहिती घेतली
दिनांक 26 मार्च 2022 रोजी राहता जि. अहमदनगर प्रगतशिल शेतकरी संदिप टिळेकर यांचे पेरु,
कांदा तसेच सचिन टिळेकर यांच्या चिकू फळबागेस भेट देवून लागवड ते विक्री व्यवस्था या
बाबत सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील काटेकोर
शेती प्रकल्पास भेट देऊन शेतकऱ्यांनी तज्ञा मार्फत शेडनेट, पॉली हाऊस मधील वांगी, मिरची
व ब्रोकोली लागवडी बद्दल सविस्तर मार्गदर्शन घेतले.
0000
Comments
Post a Comment