जिल्ह्यातील अहमदपूर,औसा, निलंगा नगरपरिषद निवडणूक -2022 कार्यक्रम जाहीर 18 ऑगस्ट रोजी मतदान, तर मतमोजणी 19 ऑगस्ट रोजी, आदर्श आचारसंहितेचे पालन करावे - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 जिल्ह्यातील अहमदपूर,औसा, निलंगा नगरपरिषद 
निवडणूक -2022 कार्यक्रम जाहीर 
18 ऑगस्ट रोजी मतदान, तर मतमोजणी 19 ऑगस्ट रोजी,  
आदर्श आचारसंहितेचे पालन करावे 

- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.


लातूर,दि.11 (जिमाका):-  राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यांमधील 92 नगरपरिषदा व 4 नगर पंचायतींच्या सार्वत्रिक सदस्य पदासाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, औसा, निलंगा नगर परिषदेचा समावेश आहे. दिनांक 8 जुलै, 2022 रोजी पासून निवडणूकीची आचार संहिता लागू झाली आहे. ही आदर्श आचार संहिता निवडणुकीचा निकाल होईपर्यंत अंमलात राहील. 

आचार संहिता सार्वत्रिक निवडणुकांकरिता नगर परिषदा / नगर पंचायतीच्या संपूर्ण क्षेत्रात लागू राहील. उपरोक्त क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती / घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकाऱ्यांना इतरत्र सुध्दा करता येणार नाही, तसेच आदर्श आचार संहितेचे पालन करण्याचेही आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले. 

आज जिल्हाधिकारी कार्यालयात या निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी नगरपालिका प्रशासनाचे सह आयुक्त रामदास कोकरे, संबंधित तीनही नगर पालिकाचे मुख्य अधिकारी उपस्थित होते.

या निवडणूक कार्यक्रमाच्या निवडणूक कोणत्याही टप्यावर अतिवृष्टी, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्ती निवडणूक असलेल्या क्षेत्रात उद्भवल्यास त्याबाबतचा अहवाल तात्काळ आयोगास सादर करण्यात येईल,  यांची संबंधितांनी दक्षता घेण्याबाबतही यावेळी जिल्हाधिकारी यांनी नमूद केले.

मंगळवार, दि. 5 जुलै, 2022 रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. दिनांक 20 जुलै, 2022 रोजी, निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी जारी करतील. नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी शुक्रवार, दिनांक 22 जुलै, 2022 सकाळी 11-00 ते गुरुवार, 28 जुलै, 2022 रोजी दुपारी 2-00 वाजेपर्यंत , वरील नामनिर्देशपत्रे स्विकारण्याचा कालावधी शुक्रवार , 22 जुलै, 2022 ते गुरुवारी दिनांक 28 जुलै, 2022 रोजी सकाळी 11-00 ते दुपारी 3-00 पर्यंत . शनिवार, दिनांक 23 जुलै, 2022 (रविवार, दिनांक 24 जुलै, 2022 या सुट्टींच्या दिवशी नामनिर्देशपत्र स्विकारण्यात येणार नाहीत.) नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक शुक्रवार, दिनांक 29 ऑगस्ट, 2022 रोजी दुपारी 11 वाजल्यापासून. नामनिर्देशन मागे घेण्याचा अंतिम गुरुवार, दिनांक 4 ऑगस्ट, 2022 दुपारी 3-00 वाजेपर्यंत. 

अपील असल्यास वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत, जिल्हा न्यायाधिशाकडे अपिल करता येईल. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत. अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र सोमवार, दिनांक 8 ऑगस्ट, 2022 पर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्दी करण्याचा दिनांक उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी , आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक गुरुवार, दिनांक 18 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 7-30 पासून ते सांयकाळी 5-30 पर्यंत, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक शुक्रवार, दिनांक 19 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 10-00 वाजल्यापासून.  कलम 19 मधील तरतुदीनुसार निकाल प्रसिध्द करण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. 

***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु