अखेर ठरले... 24 जुलै रोजी मांजरा नदीच्या दुतर्फा 28 हजार वृक्षाची लागवड होणार

 

अखेर ठरले... 24 जुलै रोजी मांजरा नदीच्या दुतर्फा

 28 हजार वृक्षाची लागवड होणार

लातूर जिल्ह्याला हरित करण्याच्या चळवळीची सुरुवात ; नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा

   - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

21 जुलै रोजी लातूर शहरातून वृक्ष लागवड जनजागृती रॅली, जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी होणार सहभागी

"एक व्यक्ति- किमान तीन झाड, आपला श्वास अन आपलेच झाड"  हे या मोहिमेचे ब्रीद

        लातूर,दि.6(जिमाका) लातूर जिल्ह्यातील सर्वात अधिक लांबीची मांजरा नदी पासून जिल्ह्यातील वृक्ष लागवडीला दि. 24 जुलै पासून सुरुवात केली जाणार असून.. नदीच्या दुतर्फा पाच पाच किलो मीटरची मानवी साखळी एकाच वेळी 56 हजार हात हे वृक्ष लावतील. ज्या जिल्ह्याचे वृक्षाच्छादन केवळ अर्धा टक्के आहे, ही बाब मानवी जीवनालाच आव्हान आहे. त्यामुळे लातूर जिल्हा येणाऱ्या काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून ते वृक्ष जगवणारा जिल्हा म्हणून देशभर ओळखला जावा यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी या चळवळीचा भाग व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.

        आज जिल्हाधिकारी कार्यालयात 28 हजार वृक्ष लागवड मोहिमेच्या निजोजनासाठी सर्व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना समनव्यक यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

          यावेळी उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, मा. आ. पाशा पटेल, वृक्ष चळवळीत काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटनाचे पदाधिकारी, विविध महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समनव्यक यावेळी उपस्थित होते.

        लातूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवड करून गप्प न बसता त्या वृक्षाचे संगोपन करण्याचे काम करणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यात आपण सर्वात कमी वृक्ष असलेल्या जिल्ह्यात मोडतो, हे आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. ही वेळ आपण जागे होण्याची आहे. ही चळवळ कोण्या समूहाची, कोण्या संघटनेची न राहता जन सामान्यांची चळवळ होणं गरजेचं आहे. जेवढी शेत जमीन अन्नधान्यासाठी गरजेची आहे, तेवढेच जगण्यासाठी स्वच्छ ऑक्सिजनची आवश्यकता आहे. जेवढे अधिक वृक्ष तेवढी ऑक्सिजनची मात्रा अधिक, जेवढे पर्यावरण संवर्धन तेवढी जैवविविधता संपन्न यागोष्टीचे भान प्रत्येकामध्ये यावे यासाठी या चळवळीची सुरुवात करु या असे सांगून लातूर  जिल्ह्यातील विविध सेवाभावी संघटना, सर्व नागरिक, विद्यार्थी यांनी या मोहिमेचा कोणाच्याही सांगण्याची, बोलावण्याची वाट न बघता हिस्सा व्हावे असे आवाहनही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

21 जुलै रोजी लातूर शहरात आणि गावांमध्ये प्रभात फेरी

           वृक्ष लागवड आणि त्याचे संगोपन करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा याच्या जागृतीसाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्यासह सर्व अधिकारी, विद्यार्थी, नागरिक यांची 21 जुलै रोजी सकाळी शिवाजी चौक ते गांधी चौका पर्यंत रॅली निघेल यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असे प्रशासना तर्फे आवाहन करण्यात येत आहे. मांजरा नदीकाठावरच्या ज्या गावात वृक्षारोपण होणार आहे.. तिथल्या शाळेच्या मुलांचीही दि. 21 जुलै रोजी सकाळी त्या त्या गावात नागरिकांच्या सहभागासह प्रभात फेरी निघेल असे नियोजन करण्यात आले आहे.



 

                                                 000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु