जिल्ह्यातील मतदारांनी मोठया संख्येने आधार क्रमांकाशी जोडणी करावी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांचे आवाहन

 

जिल्ह्यातील मतदारांनी मोठया संख्येने आधार क्रमांकाशी जोडणी करावी
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांचे आवाहन
 

·         मतदार यादी सुधारणा कार्यक्रम 1 ऑगस्ट पासून मतदान ओळखपत्र आधारला जोडणार

·         1 एप्रिल, 2023 पर्यंत किंवा तत्पुर्वी मतदार यादीत असलेली प्रत्येक व्यक्ती याचा आधार क्रमांक उपलब्ध करून देऊ शकतो.

·         अर्ज क्र. 6 ब च्या छापील प्रती देखील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार

·         स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची नियुक्त्या

 

*लातूर,दि.18,(जिमाका):-* 1 ऑगस्ट, 2022 पासून मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहीती संग्रहित करणे या उपक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने आधार क्रमांकाची जोडणी करून पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती.सुचिता शिंदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

*मा.भारत निवडणुक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांचेद्वारा निवडणुक कायदा (सुधारणा) अधिनियम,2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम,1950 मध्ये सुधारणा केल्या आहेत. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 23 मधील दुरुस्तीने स्पष्टपणे नमूद केले आहे की, विद्यमान मतदारांकडून आधार संकलनाचा उद्देश मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आहे. सदर कार्यक्रमाचा उद्देश कायदेशीर तरतुदीस अनुसरून आहे. तथापि, आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्या वतीने ऐच्छिक आहे.

उपरोक्त कायदा आणि नियमांमध्ये केलेल्या सुधारणांनंतर, मतदार नोंदणी अधिकारी (ERO) हे मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरूपात आणि रीतीने आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आलेले आहेत. तसेच अधिसुचना दि. 17 जुन, 2022 मध्ये निर्दिष्ट केल्यानुसार दि. 1 एप्रिल, 2023 पर्यंत किंवा तत्पुर्वी मतदार यादीत असलेली प्रत्येक व्यक्ती याचा आधार क्रमांक उपलब्ध करून देऊ शकतो. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 23 मधील तरतुदीनुसार मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांच्या आधार क्रमांक भरण्यासाठी मतदार नोंदणी नियम 1960 मधील नियम 26 ब मध्ये नमुना अर्ज क्र. 6 ब तयार करण्यात आला आहे. अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तसेच, मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. तसेच अर्ज क्र. 6 ब च्या छापील प्रती देखील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठीची सुविधा पोर्टल/ अॅपच्या माध्यमातुन देण्यात येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्याच्या दोन पध्दती असतील :-
(i) स्व-प्रमाणीकरण भारत निवडणुक आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल/ अॅपच्या माध्यमातुन मतदार ऑनलाईन पध्द्तीने अर्ज क्र. 6 ब भरून आधार क्रमांक नोंदवू शकतो आणि UIDAI कडे नमुद असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त OTP द्वारे आधारचे प्रमाणीकरण करु शकतो. तथापि, तपशिलात फरक असल्यास प्रमाणीकरण अपयशी ठरण्याची शक्यता आहे.

 (ii) स्व-प्रमाणीकरणाशिवाय जर मतदारास स्व-प्रमाणीकरण करावयाचे नसल्यास किंवा वरीलप्रमाणे प्रमाणीकरण अपयशी ठरत असल्यास, मतदार त्याचा स्व-प्रमाणीकरणाशिवाय ऑनलाईन पध्द्तीने अर्ज क्र. 6 ब भरून त्यासोबत योग्य दस्तावेज सदर करू शकतो. अर्जाद्वारे घरोघरी भेटी देऊन मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र. 6ब द्वारे स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची नियुक्ती मतदार नोंदणी अधिकारी यांचेद्वारे करण्यात आलेल्या आहेत.
मतदार यादीतील कोणत्याही विद्यमान मतदारांचा आधार क्रमांक सादर करण्यास असमर्थतेच्या आधारावर मतदार यादीतील कोणतीही नोंद वगळण्यात येणार नाही.

*****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा