ग्रीन लातूरसाठी जिल्हाधिकारी यांनी अभिनव प्रकल्प घेतला हाती

 

ग्रीन लातूरसाठी जिल्हाधिकारी यांनी अभिनव प्रकल्प घेतला हाती

मांजरा नदीच्या दुतर्फा दहा किलो मीटरची मानवी साखळी तयार करून एकाच वेळी होणार 28 हजार वृक्षारोपण

जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान एक हेक्टर क्षेत्रामध्ये होणार ऑक्सिजन पार्क

 

        लातूर दि. 2 ( जिमाका ) लातूर जिल्हा राज्यातील सर्वात कमी वृक्षाच्छादित असलेल्या जिल्ह्यात मोडतो. जिल्ह्यात फक्त अर्धा टक्के एवढे वृक्षाच्छादन आहे. येणाऱ्या काळात हे झपाट्यानी वाढविण्यासाठी मांजरा नदीच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याचा संकल्प असून येत्या दोन आठवड्यात लातूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचा सहभाग घेऊन दहा किलोमीटरची मानवी साखळी तयार करून एकाच वेळी 28 हजार वृक्षाची लागवड करणार असल्याचे सांगून येत्या काही दिवसात जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान एक हेक्टर ऑक्सिजन पार्क तयार केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

          आज मांजरा नदीच्या काठावरील गावांचे सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, लातूर मधील महाविद्यालयाचे संस्थाचालक, प्राचार्य यांच्या बरोबर   ग्रीन लातूर संकल्पाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, बांबू लागवडीचे प्रणेते माजी आ.पाशा पटेल, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, उपजिल्हाधिकारी रोहयो नितीन वाघमारे, सहायक वनसंरक्षक (रोहयो व कँपा),  उस्मानाबाद, मु. लातूर.,विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण हे उपस्थित होते.

           राष्ट्रीय स्तरावर मानवी आरोग्यासाठी एकूण 33 टक्के वृक्षाच्छादित क्षेत्र असणे गरजेचे असल्याने राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. लातूर जिल्ह्यात फक्त अर्धा टक्का एवढे वृक्षाच्छादन आहे. ते वाढविणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. मागच्या काही महिन्यापासून प्रयत्नशील आहेत. आता पावसाळा सुरु असून या काळात अधिकाधिक वृक्षलागवड करण्यासाठी ग्रीन लातूर संकल्प त्यांनी हाती घेतला आहे , त्याचाच भाग म्हणून येत्या दोन आठवड्यात लातूर शहरातील दयानंद महाविद्यालय, शाहू महाविद्यालय, बसवेश्वर महाविद्यालय, जयक्रांती महाविद्यालय, कॉकसीट महाविद्यालय आणि इतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या सहकार्याने मांजरा नदीच्या दुतर्फा 5 किलो मीटर मानवी साखळी तयार करून वृक्षलागवडीला सुरुवात करणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे यांनी दिली.

नदीच्याच काठावर का?

         जिल्ह्यातील सर्व नदीकाठानी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणं गरजेचे आहे.यात प्रामुख्याने

बांबू, उंबर, जांबुळ,करंज, अर्जुन, गोंदण असे वृक्ष असणार आहेत. या वृक्षामुळे नदीच्या पाण्याची धारण क्षमता वाढते , वृक्षाची मुळामुळे मातीत एकजिनसीपणा येतो त्यामुळे ते नैसर्गिक बांध तयार होऊन काही प्रमाणात नदीच्या पुरापासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळू शकते. तसेच बांबू सारखे झाड लावले तर त्याची नैसर्गिक जाळी आणि शासनाच्या नव्या नियमानुसार बांबू हे गवत वर्गीय असल्यामुळे तीन वर्षाला वाढले की तोडता येते, त्याला मार्केट मध्ये चांगले मूल्य मिळते.पुन्हा ते झपाट्याने वाढते. त्यामुळे नदीच्या पाण्याचे संवर्धन आणि त्या भोवतालची जैवविविधता निर्माण व्हावी हा या मागचा प्रयत्न आहे.

गावागावात ऑक्सिजन पार्क

            लातूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात कमीत कमी एक हेक्टर क्षेत्रावर अधिकाधिक ऑक्सिजन देणाऱ्या विविध वृक्षाची लागवड करून एक ऑक्सिजन पार्क तयार करायचा संकल्प असून त्याचे नियोजन सुरु असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

           याची सुरुवात म्हणून मांजरा नदीच्या काठावरील भातखेड, भातांगळी,सोनवती, धनेगाव, रमजानपूर, भाडगाव, उमरगा ,बोकनगाव, बिंदगीहाळ, सलगरा, शिवणी या गावात लोकांचे प्रबोधन व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जन जागृती केली जात आहे. यासाठी उपजिल्हाधिकारी ( रोहयो ) नितीन वाघमारे यांची नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांनी नियुक्ती केली आहे. लातूर जिल्ह्यातील वृक्ष वाढीच्या चळवळीत सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा तसेच प्रत्येक नागरिकांनी स्वतः कमीत कमी  तीन वृक्ष



लावून संवर्धन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.यांनी केले आहे.

 

                                                           0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु