लातूर येथे २ सप्टेंबर रोजी रानभाजी महोत्सव २०२६-२७ चे आयोजन

लातूर येथे २ सप्टेंबर रोजी रानभाजी महोत्सव २०२६-२७ चे आयोजन लातूर, दि. ३१ : रानभाज्यांचे मानवी आरोग्यातील महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यांचा प्रसार करणे तसेच त्यांच्या विक्रीसाठी एक सक्षम विपणन साखळी निर्माण करणे या मुख्य उद्देशाने कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२७ या वर्षाकरिता विशेष रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा रानभाजी महोत्सव बुधवारी, २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत लातूर शहरातील औसा रोडवरील दत्त मंदिराशेजारील कल्पतरु मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. महोत्सवामध्ये दुर्मीळ रानभाज्या आणि रानफळांची वैशिष्ट्ये, त्यांचे औषधी गुणधर्म, आरोग्यासाठी होणारे उपयोग, रानभाज्यांच्या संवर्धन पद्धती आणि पारंपरिक पाककृती (रेसिपी) यांची सचित्र व तांत्रिक माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. तसेच या महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या व रानफळे थेट खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. लातूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे रानभाज्या व रानफळे उपलब्ध आहेत, त्यांनी ही उत्पादने महोत्सवात विक्रीसाठी सोबत आणावीत; कृषी विभागामार्फत त्यांना विक्री व्यवस्थापनाची योग्य सोय उपलब्ध करून दिली जाईल. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक बंधू-भगिनींनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रानभाज्यांची माहिती जाणून घ्यावी व रानभाज्यांची खरेदी करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि 'आत्मा'चे प्रकल्प संचालक यांनी केले आहे. ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत