नागरिकांनी प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत

 

नागरिकांनी प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत

 

       लातूर,दि.25(जिमाका):- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजामुळे राष्ट्रध्वजाचा आवमान होतो. याकरीता प्लास्टिकचा राष्ट्रध्वज  वापरण्यास प्रतिबंध असल्याचे परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.  

            दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून कागदाच्या व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर कागदी व प्लास्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय  ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. 

            ध्वज संहितेच्या कलम 2.2 मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज  वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतुदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा. जिल्हाधिकारी यांनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर  थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्याच्या सूचना आहेत. 

            या समित्या पुढील प्रमाणे राहणार असून यात जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्‍हाधिकारी असून, पोलीस अधिक्षक,  मुख्‍य कार्यकारी अधिकारी जि.प. लातूर, आयुक्‍त, महानगरपालीका, लातूर,  जिल्‍हा माहिती अधिकारी, लातूर, जिल्‍हा क्रीडा अधिकारी, लातूर, शिक्षणाधिकारी/ माध्‍यमिक/प्राथमिक, नेहरु युवा केंद्र, लातूर हे समितीची  सदस्य असतील तर  समितीचे सदस्‍य सचिव उपजिल्‍हाधिकारी सामान्‍य हे असणार आहेत.            

          तर तालूकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसीलदार हे असून, पोलीस निरीक्षक/ उपनिरीक्षक, गटविकास अधिकारी, मुख्‍याधिकारी नगरपरिषद, गट शिक्षण अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी, अशासकीय सेवाभावी संस्‍था / संघटना हे समितीचे सदस्य असतील तर  नायब तहसीलदार, महसूल  हे सदस्‍य सचिव म्हणुन समितीचे कामकाज पाहतील.

            कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनाना देण्यात आले आहे. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनानी तसेच नागरिकांनी सुपूर्द केलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. 

            त्यानुसार खराब झालेल्या राष्ट्रध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, तसेच नागरिकांनी प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत असे गृह विभागाच्या परिपत्रकात आदेशित करण्यात आले आहे.

                                                           

                                                        0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु