प्राचीन मंदिराच्या विकासासाठी पुरातत्त्व विभागाकडून विकास आराखडा आखणार ; सुरुवात रेणापूरच्या रेणुका माता मंदिरापासून करणार - वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक विकास मंत्री अमित देशमुख
प्राचीन मंदिराच्या विकासासाठी पुरातत्त्व विभागाकडून विकास आराखडा आखणार ; सुरुवात रेणापूरच्या
रेणुका माता मंदिरापासून करणार
- वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक विकास मंत्री अमित
देशमुख
▪️
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी असलेल्या पाणगाव चैत्यभूमीचा विकास करणार
▪️
मराठवाड्यावर सूर्य प्रसन्न आहे, त्या ऊर्जेच सौरऊर्जेत रूपांतर करण्यासाठी प्रयत्न
करणार
लातूर
दि. 27 ( जिमाका ) राज्यातील तुळजाभवानी, महालक्ष्मी मंदिर, रेणापूरचे रेणुका मंदिर
या सारख्या प्राचीन मंदिराचा पुरातत्व विभागांतर्गत विकास आराखडा आखून त्या मंदिराचा
विकास करणार असून त्याची सुरुवात रेणूका माता मंदिरापासून करु तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या अस्थी असलेल्या पानगाव चैत्यभूमीचा विकास करणार असल्याची ग्वाही राज्याचे वैद्यकीय
शिक्षण व सांस्कृतिक विकास तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज दिली.
रेणापूर नगर पंचायतीच्या 11 वॉर्डातील रस्ते विकासाचे तसेच औसा, लातूर आणि रेणापूर तालुक्यातील काही गावांच्या विकास कामाचे दूरदर्श प्रणालीद्वारे रेणुका माता मंदिर रेणापूर येथे त्यांच्या हस्ते उदघाट्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा
राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार धीरज देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव,
रेणापूर नगर पंचायतीचे गट नेते पदमसिंह पाटील, नगरसेवक सर्वश्री भूषण पनूरे,अनिल पवार,
श्रीमती शिला मोटेगावकर, श्रीमती रजियाबाई शेख, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार
धम्मप्रिया गायकवाड, नगर विकास विभागाचे सह आयुक्त सतीश शिवणे, रेणापूर नगर पंचायतचे
मुख्य अधिकारी मंगेश शिंदे, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले, कोरोना
विरोधातील लढ्यात महाराष्ट्र राज्याने जे काम केले आहे ते नोंद घेण्यासारखे असून राज्यात सुरुवातीला फक्त पुण्यात कोरोना संसर्गाची
चाचणी व्हायची ती पुढच्या काही महिन्यात शासनाच्या प्रयत्नाने शासकीय आणि खाजगी अशा
मिळून एक हजार लॅब तयार झाल्या. लसीकरणातही राज्याचा देशात वरचा क्रमांक आहे. आज तिसरी
लाट आली आहे, ती तीव्रही आहे पण लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे लक्षणं सौम्य आहेत.
लातूर जिल्ह्यात कोविड - 19 संसर्ग रोखण्यासाठी मोठी व्यवस्था उभी केली. येणाऱ्या काळात
संसर्ग होणारे आजारावर मात करण्यासाठी जिल्ह्यात वेगळी व्यवस्था निर्माण करु. लातूर
येथे आज वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात बाराशे बेडचे हॉस्पिटल आहे. जिल्ह्यातील
उदगीर येथे 200 बेडचे रुग्णालय आहे. आता अहमदपूर येथे 200 बेडचे, जळकोट, चाकूर आणि
इतर तालुक्यातही मोठे रुग्णालय उभी करु. येत्या दिवसात जिल्ह्यात मोहल्ला क्लिनिक ही
संकल्पना राबविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विकासासाठी निधी कमी पडू दिला
जाणार नाही
लातूर ग्रामीणसाठी आता पर्यंत विविध
विकास कामासाठी 650 कोटी, उदगीर 800 कोटी आणि इतर तालुक्यातही विकासासाठी निधी दिला
जाईल. तसेच रेणापूर शहराच्या पाणी पुरवठा योजनेची
मंजूरी अंतिम टप्यात असून मराठवाडा वॉटर ग्रीड मध्ये लातूरचा समावेश करण्यात आल्याची
माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी दिली.
आरोग्य विमा काढून घेण्याचे
आवाहन
आता छोट्या शहरात रोगाचे निदान होणे गरजेचे
आहे. आज आपल्याला जसे पीक विम्याचे पैसे जमा झाल्याचे एस एम एस वरून कळते. तसे तुमच्या
आरोग्याबाबत होण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाच्या आरोग्याच्या विविध योजना आहेत त्याचा
लाभ घेता येईल.त्यासाठी सर्वांना आरोग्य विमा उतरवून घेण्याला प्रोत्साहन देण्याची
गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री यांनी यावेळी केले.
पश्चिम महाराष्ट्रासारखा कृषी विकास आपल्याला करायचा असून आता मराठवाड्यात जो मुबलक प्रमाणात
सूर्य प्रसन्न होतो ती ऊर्जा सौर ऊर्जेत रूपांतरीत करण्यासाठी आता सहकारी तत्वावर सौर
ऊर्जा प्रकल्प उभी करता येईल. ज्या जमिनीवर फारसं पीक येतं नाही अशा जमिनी निवडून सोलार
फार्मसाठी शेतकऱ्यांनी पुढं यावा, सरकार गुंतवणूकदार शोधून देण्याचं काम करेल असे सांगून
आता शेती मध्ये पॉली हाऊस उभं करून फळ भाज्या इतरही प्रयोग करता येतील. ऊसाच्या रसापासून
आता इथेनॉल निर्माण केलं जात आहे त्यामुळे आता ऊस पर्यावरण पूरक इंथन तयार करण्यासाठी
उपयोगी पडणार आहे. येत्या काळात लातूरचे विमानतळ कृषी निर्यातीसाठी कार्गो हब करण्यासाठी
प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
पालकमंत्री लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी
आग्रही असून जिल्ह्याचा अधिकाधिक विकास करण्यासाठी निधी मिळवू तसेच ग्रामीण भागातील
लोकांना प्रती व्यक्ति 55 लिटर पाणी देण्याचा हे शासन प्रयत्न करत असल्याचे पाणी पुरवठा
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. तसेच शरद पवार ग्राम समृद्धी योजनेतून अधिकाधिक
गावांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही राज्यमंत्री बनसोडे यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ.धीरज देशमुख यांनी
केले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, आता प्रत्येक
प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्ण वाहिका मिळाल्याचे सांगून वैद्यकीय ऑक्सिजन मध्येही
आपण स्वयंपूर्ण झालो आहोत. ही आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील
आहे. रेणापूर शहरासाठी 30 बेडचे रुग्णालय 100 बेडचे करण्यासाठी आपला प्रयत्न राहील
असेही ते यावेळी म्हणाले.
0000
Comments
Post a Comment