ग्राहकहित सर्वतोपरी- डॉ. राजेंद्र शिंगणे मंत्री, अन्न व औषध प्रशासन

 

ग्राहकहित सर्वतोपरी

 

गेल्या दोन वर्षातील जवळपास 18 महिने हे कोविडच्या सावटाखाली गेले. अन्न

व औषध प्रशासन विभागाचा मंत्री म्हणून या कठीण काळात ग्राहकांना

अन्नपदार्थांचा निर्भेळ पुरवठा व्हावा आणि त्याचबरोबर कोविड आणि इतर आजारांसाठी लागणारे औषधोपचार वेळेत मिळून त्यांचे जीवन सुसह्य बनवण्यावर भर देण्यात आला.

 

डॉ. राजेंद्र शिंगणे

मंत्री, अन्न व औषध प्रशासन

 

माहे जानेवारी 2020 मध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या विभागाचे मंत्रिपद मला मिळाले. या प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेण्याचे काम सुरू असतानाच फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये देशात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. ही साथ नवीन असल्याने त्यावर नियंत्रण करणे, त्यांच्याशी लढा देणे, त्यावर औषधी नसल्याने बचाव हाच उपाय या तत्त्वावर काम सुरू केले. या आजाराची तीव्रता भयानक होती. तरीसुद्धा मी, आरोग्यमंत्री, गृहमंत्री तसेच माझ्या विभागातील अधिकारी यांनी धीर न सोडता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या संकटाचा सामना करण्याचा निर्धार केला.

या काळात 15 ते 18 तास सतत कामात व्यस्त असायचो. मी माझ्या अधिकार्‍यांसोबत मेडिकल स्टोअर्स, सॅनिटायझर उत्पादक, रुग्णालय व वितरकांना भेटी देऊन परिस्थितीचा अभ्यास करून वेळोवेळी धाडसी निर्णय घेतले. आवश्यक ठिकाणी तपासण्या, धाडी, जप्ती, खटले दाखल करणे आदी कारवाया करण्याचे निर्देश दिले.

 

महत्त्वपूर्ण निर्णय

कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेता अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्षाची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी एक यंत्रणा उभारली गेली. या काळात सॅनिटायझरच्या मागणीत वाढ झाल्याने बाजारात बनावट किंवा विनापरवाना किंवा कमी दर्जाचे सॅनिटायझरचे उत्पादन किंवा विक्री होऊ नये तसेच मास्क व सॅनिटायझरचा काळा बाजार होऊ नये, यासाठी अधिकाधिक तपासणी व धाडसत्र राबवण्यात आले. तसेच सॅनिटायझरची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अल्कोहोल उत्पादकांना (डिस्टिलरिज) एका दिवसात परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सॅनिटायझरची उपलब्धता वाढली. तसेच किमतीवरही नियंत्रण राहिले. सॅनिटायझर/ मास्कच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल (अल्कोहोल, लिनॅन) चे दर वाढू नये, यासाठी दरनिश्चितीसाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ही दरनिश्चिती झाले. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे हित जोपासता आले.

या काळात ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी व थॅलेसेमिया रुग्णांना रक्तपुरवठा नियमित अथवा रक्ताची कमतरता येऊ नये, रक्त व रक्त घटक उपलब्ध व्हावे, यासाठी अधिकाधिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन घाऊक वितरक व 10 किरकोळ औषध विक्रेत्यांकडे खासगी व्यावसायिकांसाठी माफक दरात पीपीई किट व एन - 95 मास्क किंवा या दर्जाचे इतर मास्क उपलब्ध करण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला.

योग्य किमतीत अन्नपदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील, यासाठी सर्व उत्पादक व वितरकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मुख्यालय व जिल्हास्तरावर नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. रेमडेसीवीर व टोसिलीझुमॅब या औषधांच्या काळाबाजारास आळा घालण्यासाठी पोलीस विभागाच्या मदतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. तसेच दोषींवर कारवाई करण्यात आली. या प्रयत्नामुळे तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या सेवेमुळे व जनतेने दिलेल्या सहकार्यामुळे जानेवारी-फेब्रुवारी 2021 मध्ये कोविड-19ची रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसून आले.

दुसरी लाट आणि काळजी

सर्व रुग्णांना योग्य उपचार मिळत असल्याचे, मृत्यूची संख्या कमी होत असल्याचे दिसून आले. सर्व बाबी नियंत्रणात येत असल्याचे चित्र निर्माण झाले असताना पुन्हा मार्च 2021 मध्ये कोरोनाच्या नवीन विषाणुने धुमाकुळ घातला व कोविडची दुसरी लाट आली. ही लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त भयानक होती. मृत्युदरात अचानक वाढ झाली. उपलब्ध झालेल्या रेमडेसीवीर, टोसिलीझुमॅब व ऑक्सिजनची टंचाई पुन्हा निर्माण झाली, या सर्व बाबींवर विचार करून राज्य शासन व केंद्र शासनाने राज्यात व देशात उत्पादन होणार्‍या या औषधाचे उत्पादन वितरण व वापर यावर नियंत्रण करण्यासाठी यंत्रणा उभारली.

सर्व राज्यांना केंद्र शासनाच्या

निर्देशानुसार प्राप्त होणार्‍या या औषधांचा पुरवठा महाराष्ट्रासाठी कसा वाढवता येईल, यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक जिल्ह्यात व रुग्णालयात रुग्णांना या औषधाचे वाटप जिल्हाधिकारी व प्रशासनामार्फत करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला. राज्यात उत्पादनात वाढ करण्यासाठी रेमडेसीवीर इंजेक्शन, इतर औषधे व ऑक्सिजन उत्पादकांना भेट देऊन त्यांना राज्यासाठी जास्त प्रमाणात उत्पादन करण्याबाबत

निर्देश दिले गेले.

शासकीय, निमशासकीय व खासगी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे निर्णय घेण्यात आले. उत्पादनात वाढीव्यतिरिक्त उत्पादन झालेल्या ऑक्सिजनचे जास्तीत जास्त वाटप / वितरण रुग्णांसाठी व्हावे, यासाठी इतर उद्योगधंद्यांसाठी लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी करण्यात आला. इतर राज्यातून ऑक्सिजन मागवण्यात आला. अशा प्रकारे सर्व प्रयत्न करून परिस्थितीवर विजय मिळवण्यात यश आले.

रक्तटंचाईवर उपाय योजना

कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे रक्तदात्यांची संख्यासुद्धा कमी झाली व रक्ताची टंचाई वारंवार होऊ लागली, यावर उपाययोजना म्हणून मी व सार्वजनिक आरोग्य मंत्री तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वारंवार रक्तदात्यांना आवाहन करून रक्तदान शिबिरे घेतली व रक्ताची टंचाई भासू दिली नाही.

असे सर्व प्रयत्न सुरू असतानादेखील प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी मधाच्या दर्जा (केपशू) तपासणीसाठी मोहीम हाती घेतली व 86 नमुने चाचणीसाठी घेतले व 3,480 किलोचा साठा जप्त केला.

मोफत रक्षक किट

यासोबतच बुलडाणा जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना मोफत कोविड-19 रक्षक किटचे वितरण करण्यात आले. कोकणातील पूरग्रस्तांना मास्क, सॅनिटायझर व औषधे तसेच अन्नपदार्थ प्रशासनाच्या व हितचितकांच्या सहकार्याने पाठवण्यात आले.

कोविड-19ची तिसरी लाट आल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सुद्धा आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून रेमडेसीवीर इंजेक्शन, मेडिकल ऑक्सिजन व इतर उपचारासाठी लागणारे साहित्य याची पूर्ण तयारी शासनाने केली आहे. जनतेच्या आरोग्यासाठी शासनस्तरावर निरंतर कार्य सुरू आहे व सुरू राहील.

शब्दांकन : अर्चना शंभरकर,

विभागीय संपर्क अधिकारी

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु