ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची कामे पारदर्शक, अतिक्रमणमुक्त व गुणवत्तापूर्ण करावीत - पालकमंत्री अमित देशमुख

 

ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची कामे

पारदर्शक, अतिक्रमणमुक्त व गुणवत्तापूर्ण करावीत

n  पालकमंत्री अमित देशमुख


लातूर दि.27 ( जिमाका ):-  रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील दहा तालुक्यांना 181 पाणंद शेतरस्ते 278 किलो मीटर लांबीच्या रस्त्यांना 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची कामे गतिशिल, पारदर्शक, अतिक्रमणमुक्त व गुणवत्तापूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.


जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 181 पाणंद रस्त्यांच्या दूरदृष्यप्रणाली ( व्हिडीओ कॉन्फरन्स) द्वारे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार अभिमन्य पवार,  लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, अहमदपूर आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन वाघमारे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आदिंची या दूरदृष्यप्रणाली (व्हिडीओ कॉन्फरन्स) द्वारे उपस्थित होते.


पालकमंत्री अमित देशमुख मार्गदर्शन करतांना म्हणाले की, जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या पाणंद रस्त्यामुळे ग्रामीण भागाचा आर्थिक विकास होणार आहे. यामुळे ग्रामीण भागाची प्रगती  होणार असून शेतकरी घटकाला खऱ्या अर्थाने न्याय मिळून पाणंद रस्ते मोकळे होणार आहेत. तसेच जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे , पाऊलवाट, गाडीवाट, पाणंद रस्ते , जिल्हा रस्ते व आंतराष्ट्रीय रस्ते विकासासोबत ग्रामीण भागातील रस्तेही विकसित होणार आहेत. पाणंद रस्ते विकसित करित असतांना कोणत्याही तक्रारी येणार नाहीत, अथवा अडचण निर्माण होणार नाही, अशा पध्दतीने जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आदिंनी ही कामे अधिक गुणवत्तेने कसे पूर्ण होतील याकडे लक्ष देण्याची सुचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली.  

रस्त्यांची कामे विणल्यामुळे अर्थकारणावर कोणता परिणाम झाला याचा अभ्यास करुन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी याबाबतची माहिती सादर करावी. जेणेकरुन गुंतवणुकीवर परतावा होतोय का याबाबतही लक्ष देता येईल. आपला जिल्हा शेतीप्रधान असून शेतकऱ्यांनी शेतीतून पिक घेतल्यावर शेतीमाल थेट बाजारपेठेत व इतर राज्यातही जाण्याबाबत महत्वकांक्षी कार्यक्रम राबविण्यात यावा, अशा सुचना संबंधितांना पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.

ज्या तालुक्यातील गावांना निधी मिळालेला नाही, येणाऱ्या काळात अशा तालुक्यातील गावांनाही निधी देणार असल्याचे सांगितले. तसेच पाणंद रस्त्यांची ही योजना वेळेत व योग्य पध्दतीने पूर्ण करण्यात यावी, असेही  निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, राज्यात लातूर जिल्हा जिल्हा नियोजन समितीचा निधी शंभर टक्के होणार आहे. उदगीर तालुक्यातील गावांना  पाणंद रस्त्यांना निधी पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. दूरदृष्यप्रणाली ( व्हिडीओ कॉन्फरन्स ) उद्घाटन कार्यक्रमास जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नागरिकांनी यात सहभाग नोंदविला.

0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु