आरोग्य यंत्रणा भक्कम-अमित देशमुख मंत्री, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य

 

आरोग्य यंत्रणा भक्कम

 

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण लोकाभिमुख निर्णय घेतले. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये कोविड-19 बाबत आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले, तर सांस्कृतिक कार्यांतर्गत विविध निर्णयांसोबतच कोविड काळात कलाकारांना अर्थसाहाय्य करून दिलासा दिला.

अमित देशमुख

मंत्री, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य

गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात कोविडचा पहिला रुग्ण आढळला आणि त्यानंतर आता पावणे दोन वर्षे आपण या कोविड विषाणुविरोधात एकत्रपणे लढत आहोत.

रुग्णांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवांचा विस्तार करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. रुग्णशय्या, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स या साधनसामग्रीची संख्या वाढवण्यासाठी आवश्यक ते निर्णय राज्य शासनमार्फत घेण्यात येत आहेत. गेल्या पावणेदोन वर्षांमध्ये आपण कोविडचे नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्यासाठी अनेक विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, त्या उर्वरित राज्यांसाठी आणि अन्य देशांसाठीही आदर्श ठरल्या आहेत.

गेल्या वर्षी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राज्यभरात राबवली. विशेष म्हणजे ही देशातील एक अभिनव आरोग्य तपासणी मोहीम ठरली. दोन फेर्‍यांमध्ये राज्यातील सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले, तर अतिजोखमीच्या व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक यांचे विशेष सर्वेक्षणदेखील करण्यात आले. या मोहिमेमुळे कोविड संसर्ग झालेले अनेक रुग्ण सापडण्यास मदत झालीच पण राज्याचा आरोग्य नकाशा तयार होण्यास मदत झाली आहे.

वैद्यकीय सेवांचे जाळे

कोविड-19 विरुद्धच्या लढाईत मिळालेल्या यशामध्ये सर्वात मोठा वाटा हा डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, आशाताई, पोलीस बांधव, स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते यांचा आहे. कोविड-19 विरुद्ध मुकाबला करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न तर केलेच पण पारदर्शक पद्धतीने उपाययोजना आखण्यात आल्या. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय सेवांचे जाळे विकसित करण्यावर भर देण्याचे नियोजन आहे. याचाच पहिला टप्पा म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापन करण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) धोरण ठरवण्यास राज्य शासनाची मान्यता देण्यात आली. शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयाबरोबरच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या (निवासी डॉक्टरांच्या) विद्यावेतनात 10 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे,

तर राज्यातील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद महाविद्यालयातील आणि शासन अनुदानित आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयातील आंतरवासिता प्रशिक्षणार्थीच्या विद्यावेतनात 6 हजार रुपयांवरून 11 हजार अशी वाढ करण्यात आली आहे.

 

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये महत्त्वपूर्ण निर्णय

 

कोविड संसर्ग उद्भवल्यानंतर राज्यात फक्त 3 कोविड-19 चाचणी प्रयोगशाळा होत्या. आता राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरू.

राज्यातील सर्व शासकीय संस्थांमध्ये कोविड-19 चाचण्या मोफत. आतापर्यंत 236 आरटीपीआर प्रयोगशाळांसह 296 आण्विक चाचणी प्रयोगशाळा स्थापन.

आतापर्यंत 5.8 कोटींपेक्षा जास्त कोविड चाचण्या करण्यात आल्या असून दैनिक आरटीपीसीआर चाचणी क्षमता 1.16 लाख नमून्यांपेक्षा जास्त.

आतापर्यंत 20 समर्पित कोविड रुग्णालये (ऊउक) स्थापन. कोविडसाठी सध्या 8 हजार 274 बेड निर्धारित, त्यापैकी 7 हजार 755 (95%) ऑक्सिजनयुक्त बेड, तर 2 हजार 147 (26%) आयसीयू बेड.

कोविडसाठी एकूण 2 हजार 544 व्हेंटिलेटर आणि 67 डायलिसिस मशीन कार्यरत.

विभागांतर्गत बालरोग कोविडसाठी एकूण 1 हजार 361 बेड निर्धारित.

कोविडच्या व्यवस्थापनासाठी 40 लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांट्ससह अतिरिक्त 40 पीएसए प्लांट तयार.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 20 हजारांहून अधिक रुग्णांची म्युकरमायकोसिसची तपासणी पूर्ण, 3 हजारांहून अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल त्यापैकी 2 हजार 500 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण.

मुख्यमंत्री सहायता निधीतून मुंबईच्या सेंट जॉर्जेस हॉस्पिटल येथे 100 खाटांचे आयसीयू वॉर्ड तयार करण्यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद. कोल्हापूर, अंबेजोगाई आणि नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मशीनरी खरेदीसाठी 20 कोटी रुपयांची तरतूद.

नंदुरबार, सिंधुदुर्ग आणि उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रथम वर्षाकरिता 100 विद्यार्थी प्रवेशास परवानगी, तर सिंधुदुर्ग येथे 500 आणि उस्मानाबाद येथे 430 रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मान्यता.

नांदेड येथे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे 50 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय परिचर्या अर्थात बी.एस्सी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता. तर अकोला, यवतमाळ, लातूर आणि औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनेंतर्गत अतिविशेषोपचार रुग्णालय सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्याकरिता 888 पदे निर्माण करण्यास मान्यता.

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्नित 430 रुग्ण खाटांचे रुग्णालय आणि वैद्यकीय पदव्युत्तर पदवी संस्था सुरू करण्यास मान्यता.

सांस्कृतिक

कोविड-19 च्या प्रार्दुभावामुळे मनोरंजन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. मात्र लॉकडाऊन काळात बंद असलेले चित्रीकरण मिशन बिगीन अगेन म्हणत सुरू करण्यात आले. राज्यातील नाट्यगृहे/सिनेमागृहे 50 टक्के आसन क्षमतेसह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली, तर बंदिस्त व मोकळ्या मैदानातील सांस्कृतिक कार्यक्रमांनाही अटी व शर्तींसह मान्यता देण्यात आली. मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण ठरवण्याचे काम सुरू असून या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतही सकारात्मक प्रयत्न करण्यात येत आहेत.

सांस्कृतिक विकासासाठी...

गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच या परिसरात पर्यटन सुविधा निर्माण करणे व त्या परिसरातील जैवविविधतेचे जतन व वनीकरण करणे या कामाचे संनियंत्रण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीचे गठन करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने दर्शनिका विभागाकडून महात्मा गांधी यांचे संकलित वाड्.मय 1-98 पैकी (खंड 1 ते 50) ई -बुक स्वरूपात भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2021 रोजी प्रकाशित करण्यात आले.

लॉकडाऊन काळात चित्रपटसृष्टीतील विविध कामांना मार्गदर्शक तत्त्वांसह शासनाची मान्यता देण्यात आली असून अटी-शर्तींसह चित्रिकरणासही मान्यता देण्यात आली. कोविड-19 च्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी करावयाच्या उपयायोजनांबाबत जनजागृती करण्याचे काम कलावंतांमार्फत करण्यास मान्यता देण्यात आली. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे प्रयोगात्मक कलेवर उदनिर्वाह असणार्‍या कलावंत आणि संस्थांना शासनाकडून अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले. त्यानुसार राज्यातील 56 हजार कलाकारांना प्रति 5 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य, तर 847 कलापथकांना 6 कोटी रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य देण्यात येणार. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर रवींद्र नाट्य मंदिर आणि मिनी थिएटर यांच्या भाडेदरात 30 टक्के सवलत देण्यात आली. कोविड-19 पार्श्वभूमीवर 2020 मधील मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आरक्षित करण्यात आलेल्या रवींद्र नाट्य मंदिर आणि मिनी थिएटरच्या आरक्षण शुल्काचा 100 टक्के परतावा करण्यात आला.

पुरस्कार

राज्य शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला. राज्य शासनाचा 2018-19चा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार गुलाबबाई संगमनेरकर, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार मधुवंती दांडेकर, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार स्व. रत्नाकर मतकरी यांना, तर राज्य शासनाचा 2019-20 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना जाहीर करण्यात आला.

शब्दांकन : वर्षा फडके-आंधळे,

विभागीय संपर्क अधिकारी

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु