मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत दावणगाव-येणकी आणि प्रजिमा-31 ते आडोळ तांडा रस्ता कामाचे भूमिपूजन उदगीर, जळकोट तालुक्यात मूलभूत सुविधा निर्मितला प्राधान्य दिले- क्रीडा व युवक मंत्री संजय बनसोडे

 मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत दावणगाव-येणकी आणि प्रजिमा-31 ते आडोळ तांडा रस्ता कामाचे भूमिपूजन

उदगीर, जळकोट तालुक्यात मूलभूत सुविधा निर्मितला प्राधान्य दिले- क्रीडा व युवक मंत्री संजय बनसोडे


* दळणवळणाची सुविधा वाढविण्यामुळे विकासाला मिळाली गती

* प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून नागरीकांना आरोग्य सेवा

* वीज वितरण प्रणाली मजबूत करण्यासाठी 5 नवीन उपकेंद्रांची निर्मिती केली


लातूर, दि. 18 : उदगीर, जळकोट तालुक्याच्या विकासासाठी मूलभूत सुविधा निर्मितीवर भर देण्यात आला. यासाठी रस्त्यांच्या कामांना गती देवून दळणवळण सुविधा बळकटीकरणासह प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून नागरीकांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यास प्राधान्य देण्यात आल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.


मुख्यमंत्री ग्राम सडक योजना योजनेंतर्गत उदगीर तालुक्यातील दावणगाव-येणकी रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी दावणगाव येथील कार्यक्रमात ना. बनसोडे बोलत होते. तहसीलदार राम बोरगावकर, गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता आसिफ खैराडी, उपअभियंता ज्ञानेश्वर मुकादम, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्याम डावळे, सिध्देश्वर पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. तसेच आडोळ तांडा रस्ता कामाच्या भूमिपूजनप्रसंगी माजी आमदार गोविंद केंद्रे उपस्थित होते.


कोणत्याही भागाच्या विकासासाठी चांगल्या दळणवळण सुविधा आवश्यक असतात. त्यामुळे उदगीर आणि जळकोट तालुक्यातील विविध रस्त्यांच्या बळकटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे रस्त्यांचा दर्जा सुधारण्यास मदत होवून प्रवास गतिमान व सुखकर झाला. यासोबतच तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय सुरू करून चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे ना. बनसोडे म्हणाले.


विजेचा पुरवठा योग्य दाबाने आणि सुरळीतपणे होण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे बळकटीकरण करण्यात आले. तसेच पाच नवीन विद्युत उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले. छोटे- छोटे बंधारे, पाझर तलाव, बॅरेज उभारून उदगीर, जळकोट तालुक्यात सिंचनाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. सर्वच समाज घटकांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे केल्याचे ना. बनसोडे म्हणाले. तसेच उदगीर येथे नवीन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर झाले असून येत्या काही दिवसांत त्याचे उद्घाटन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


दावणगाव येथील कार्यक्रमात धनंजय वाघमोडे, श्याम डावळे, शिवाजी भोळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपअभियंता श्री. मुकादम यांनी केले. तसेच आडोळ तांडा येथील कार्यक्रमात माजी आमदार गोविंद केंद्रे, वैजनाथ तोंडारे यांनी मनोगत व्यक्त केले.


आडोळ तांड्याला मिळणार पक्का रस्ता


उदगीर तालुक्यातील आडोळ तांडा येथे जाण्यासाठी आजपर्यंत पक्का रस्ता नव्हता. या तांड्याला रस्ता करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. ना. बनसोडे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत आडोळ तांडा ते प्रजिमा-३१ दरम्यान जवळपास सव्वादोन किलोमिटर लांबीचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन ना. बनसोडे यांच्या हस्ते झाले. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेला रस्ता मंजूर झाला असून त्यामुळे नागरीकांना येणाऱ्या समस्या दूर होतील, असे ते यावेळी म्हणाले.


मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेतून दरमहा दीड हजार रुपये महिलांच्या थेट आधार लिंक बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. सर्व पात्र महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरण्याचे आवाहन ना. संजय बनसोडे यांनी केले. तसेच शेतकऱ्यांसाठी ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीज देण्याचाही निर्णय राज्य शासनाने घेतल्याचे त्यांनी सांगितले.

**




Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु