जळकोट येथील श्री लक्ष्मीपती बालाजी मंदिर सांस्कृतिक सभागृह, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते लोकार्पण सर्व समाज घटकांसाठी चांगल्या मूलभूत सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य - क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

 जळकोट येथील श्री लक्ष्मीपती बालाजी मंदिर सांस्कृतिक सभागृह, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते लोकार्पण


सर्व समाज घटकांसाठी चांगल्या मूलभूत सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य - क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

लातूर, दि. ७ (जिमाका) : जळकोट नगरपंचायत अंतर्गत वैशिषट्यपूर्ण योजनेतून लक्ष्मीपती बालाजी मंदिर सांस्कृतिक सभागृह आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाची उभारणी करण्यात आली आहे. या दोन्ही सभागृहांचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. सर्व समाज घटकांना चांगल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले. याकरिता जळकोट तालुक्यातील विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. यापुढेही आणखी निधी मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे ना. बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

जळकोट नगरपंचायतच्या नगराध्यक्ष प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्ष मन्मथअप्पा किडे, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी, नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी रामदास कोकरे, गट विकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, सार्वजानिक बांधकाम विभागाचे श्री. देशपांडे, श्री. कोरडे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठल चव्हाण, उपसभापती संतोष तीडके, नगरपंचायत गटनेते ऍड. तात्या पाटील, लक्ष्मीपती बालाजी मंदिर संस्थानचे रमाकांत रायवार यांच्यासह नगरपंचायतीचे नगरसेवक, समिती प्रमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

जळकोट तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड योजनेत या तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तिरू नदीवर बॅरेजसची उभारणी करण्यात आली आहे. यासोबतच विविध समाजाच्या भवनांची उभारणी करण्यात येत असून महापुरुषांच्या पुतळ्यासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. लिंगायत स्मशानभूमीच्या जमिनीचा विषय अंतिम टप्प्यात असून कोमटी समाज स्मशानभूमीसाठीही लवकरच निधी उपलब्ध होईल. तसेच जळकोट शहरातील प्रत्येक प्रभागातील पायाभूत सुविधांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे ना. बनसोडे यांनी सांगितले. तसेच जळकोट आणि उदगीर तालुक्यातील विविध विकास कामे अंतिम टप्प्यात असून या कामांचे लवकरच लोकार्पण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना जाहीर केल्या आहेत. शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी मोफत वीज देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन ना. बनसोडे यांनी केले.

प्रारंभी ना. बनसोडे यांच्या हस्ते लक्ष्मीपती बालाजी मंदिर सांस्कृतिक सभागृहाची कोनशिला अनावरण करून लोकार्पण करण्यात आले. या सभागृहासाठी जळकोट नगरपंचायत अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत ५० लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला. यातून जवळपास २५५० चौरस फुटांचा सुसज्ज सभामंडप बांधण्यात आला आहे.

जळकोट शहरात नगरपंचायत वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह बांधण्यात आले आहे. यामध्ये जवळपास १३५० चौरस फुटांचा सुसज्ज हॉल, प्रसाधनगृहे, पाणी पुरवठा, अंतर्गत पाणी व्यवस्था, इमारतीमध्ये आणि इमारत परीसरात विद्युतीकरण व प्रकाश योजना करण्यात आली आहे. या कामासाठी १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. या सभागृहाचे ना. बनसोडे यांनी लोकार्पण केले.







Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु