मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज नोंदणीसाठी तालुका, ग्रामस्तरीय सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज नोंदणीसाठी

तालुका, ग्रामस्तरीय सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

-         जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

·         तालुका आणि ग्रामस्तरावरील कार्यवाहीचा नियमित आढावा घेणार


लातूर
दि. 12 (जिमाका) : जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज गावपातळीवर स्वीकारण्याची सुविध उपलब्ध करून देण्यात आली असून यासाठी ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. तसेच तालुक्यातील अर्ज नोंदणीचे संनियंत्रण करणे, नाव नोंदणी शिबिरांचे नियोजन करण्याची जबाबदारी तालुकास्तरीय पथकाकडे देण्यात आली आहे. तालुका व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वयाने काम करून या योजनेच्या अर्ज नोंदणीला गती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. तसेच अर्ज नोंदणीचा जिल्हास्तरावर नियमितपणे आढावा घेण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रमेश जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलेला देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गाव पातळीवर नाव नोंदणी करून घेण्यात येत आहे. गाव पातळीवर ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहायक, अंगणवाडी सेविका, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका यांच्यासह अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांच्या समितीवर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पुरवठा निरीक्षक यांचा समावेश असलेले पथक तालुक्यातील ऑनलाईन, ऑफलाईन नाव नोंदणीला गती देण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करणार आहे. तरी दोन्ही पथकातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी यादीचे चावडी वाचन केले जाणार असून यामध्ये यादीवर कोणाचे आक्षेप असल्यास नोंदवून घ्यावेत. ग्रामपंचायत व अंगणवाडी येथेही यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच चावडी वाचनाची माहिती दवंडीद्वारे देवून नागरिकांना अवगत करावे. अर्जासोबत द्यावयाच्या कागदपत्रांची माहिती असलेले फलक प्रत्येक नाव नोंदणी केंद्रावर लावण्यात यावेत. त्यानुसार पात्र महिलांकडून कागदपत्रे प्राप्त करून घ्यावीत. तसेच ऑफलाईन अर्ज ऑनलाईन करण्याची कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.

या योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी अचूकपणे होण्यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी काळजीपूर्वक काम करावे. तसेच योजनेचा लाभ देताना आधारकार्ड बंधनकारक असून ऑनलाईन अर्ज भरताना प्रत्येक महिलेचा अचूक आधारक्रमांक व इतर तपशील आधारकार्डनुसारच अर्जामध्ये नमूद केला जाईल, याची दक्षता घ्यावी. तसेच ऑफलाईन अर्जातील माहिती ऑनलाईन भरताना चूक होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी दिल्या.

लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी विविध 37 ठिकाणी विशेष केंद्र सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रांवर, तसेच शहरात महत्वाच्या ठिकाणी योजनेबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांनी ग्रामस्तरीय समिती, तालुकास्तरीय पथकावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीची माहिती दिली. तसेच प्रत्येक तालुका स्तरावर बाल विकास अधिकारी हे योजनेसाठी समन्वयक म्हणून काम पाहतील, असे सांगितले.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु