वृक्ष लागवडीसाठी जनजागृती आणि सवलतीच्या दरात रोपांची विक्री

 वृक्ष लागवडीसाठी जनजागृती आणि सवलतीच्या दरात रोपांची विक्री


‘माझं लातूर, हरित लातूर’ अंतर्गत रविवारी ‘लातूर हरितोत्सव 2024’


गंजगोलाईते हनुमान चौक परिसरात विविध रोपांचे प्रदर्शन व विक्री

एकाच ठिकाणी मिळणार विविध प्रजातीच्या वृक्षांची रोपे

वृक्ष लागवडीचे महत्व पटवून देण्यासाठी निघणार वृक्षदिंडी

शेताच्या बांधावर, घराच्या अंगणात, टेरेसवर वृक्ष लागवडीबाबत होणार मार्गदर्शन


लातूर, दि. 01 (जिमाका) : जिल्ह्यातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियानांतर्गत रविवार (दि. 7) लातूर येथील गंजगोलाई परिसरात ‘लातूर हरितोत्सव 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. वृक्ष लागवडीमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांना घराच्या अंगणात, टेरेसवर कोणत्या वृक्षांची लागवड करावी, त्याचे संवर्ध कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यासोबतच विविध रोपवाटिकांच्या सहाय्याने सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी गंजगोलाई परिसरात विविध रोपवाटिकांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.


कृषि सप्ताह आणि वनमहोत्सवाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून 7 जुलै रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान ‘लातूर हरितोत्सव 2024’चे आयोजन केले जाणार आहे. जिल्ह्यातील वृक्षांची संख्या वाढविण्यासाठी फळझाडे, फुलझाडे, औषधी वनस्पती यांची लागवड आपल्या घराच्या अंगणात, टेरेसवर किंवा शेताच्या बांधावर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी रोपांची योग्य निवड करणे आणि त्यांचे संवर्धन याबाबत मार्गदर्शन करणे, चांगल्या दर्जाची रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


कृषि विभागाच्या माध्यमातून यासाठी जिल्ह्यातील रोपवाटिकांची नोंदणी करण्यात येत असून गंजगोलाई ते हनुमान चौक आणि चैनसुख रोड परिसरात 7 जुलै रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत रत्याच्या दुतर्फा विविध शासकीय आणि खासगी रोपवाटिकांचे विविध रोपांचे प्रदर्शन व सवलतीच्या दरात विक्रीचे स्टॉल लावण्यात येणार आहे. 


‘मिलेट फूड’ची चव चाखण्याची संधी


जिल्ह्यात पौष्टिक तृणधान्य लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत असून आरोग्यासाठी हितकारक असलेल्या पौष्टिक तृणधान्यांपासून अर्थात मिलेटपासून तयार करण्यात येणाऱ्या विविध पदार्थांची चव चाखण्याची संधी ‘लातूर हरितोत्सव 2024’च्या निमित्ताने मिळणार आहे. यासाठी महिला बचतगटांचे विविध स्टॉल 7 जुलै रोजी गंजगोलाई परिसरात लावले जाणार आहेत.


लातूरला हरित बनविण्यासाठी हरितोत्सवात सहभागी व्हा : जिल्हाधिकारी


‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियानामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सहभागी होवून आपल्या जिल्ह्यातील वृक्षांची संख्या वाढविण्यासाठी सक्रीय सहभाग देणे आवश्यक आहे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाविषयी नागरिकांना मार्गदर्शन मिळावे आणि त्यांना एकाच ठिकाणी विविध प्रजातीच्या झाडांची रोपे मिळवीत, यासाठी ‘लातूर हरितोत्सव 2024’चे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या हरितोत्सवात सहभागी होवून आपल्या लातूरला हरित बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु