मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज भरून घ्यावा -पालकमंत्री गिरीश महाजन


·       एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये

·       अर्ज स्वीकारण्यासाठी नियोजनबद्धपणे शिबिरांचे आयोजन करावे

लातूर, दि. 14 :  राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये आणि शहरी भागातील महिलांनी आपल्या वार्डमध्ये सुरु करण्यात आलेल्या नावनोंदणी केंद्रात जावून विहित कागदपत्रांसह अर्ज भरून देण्याचे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज भरून घेण्याची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना गरीब, गरजू महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी चालना देणारी ठरणार आहे. या योजनेतून प्रत्येक पात्र महिलेच्या आधार सलंग्न बँक खात्यात दरमहा 1 हजार 500 रुपये म्हणजेच दरवर्षी 18 हजार रुपये डीबीटीद्वारे थेट जमा करण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्यात आली आहे. महिलांकडून ऑफलाईन अर्ज स्वीकारून ते ऑनलाईन भरण्यासाठी गावपातळीवर आणि शहरी भागातही निशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले.

या योजनेची व्याप्ती वाढवून अर्जासोबत जोडण्यासाठी सहज उपलब्ध होणाऱ्या कागदपत्रांचे विविध पर्याय देण्यात आले असून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व पात्र महिलांनी या योजनेसाठी अर्ज करावेत. 12 जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार अर्ज भरण्यासाठी काही सुलभ पद्धती सुचविण्यात आल्या आहेत. शासकीय यंत्रणांनी सर्व नवीन बदल लक्षात घेऊन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले. तसेच योजना कायमस्वरूपी असून दीर्घकाल चालणार आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे योजनेच्या बाबतीत चुकीच्या नकारात्मकता पसरवणाऱ्या बाबींकडे दुर्लक्ष करून सर्व समाज घटकातील महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

योजनेसाठी पात्र महिलांच्या नोंदणीसाठी ग्रामीण भागात, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे महिलांना आपले अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्हा प्रशासनाने शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करून प्रत्येक पात्र महिलेचे अर्ज विहित कालावधीत भरून घेण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. महाजन यांनी दिल्या.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु