मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेसाठी 81 हजार अर्ज प्राप्त अर्ज छाननी, ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला गती द्यावी -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेसाठी 81 हजार अर्ज प्राप्त

अर्ज छाननी, ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला गती द्यावी

-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

·         प्रत्येक प्राप्त अर्जांच्या यादीचे चावडी वाचन करणे आवश्यक

·         विविध योजनांच्या लाभार्थी महिलांच्या यादीचा वापर नाव नोंदणीसाठी करा

लातूरदि. 15 (जिमाका) : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येक गावात आणि शहरी भागात अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्यात आली आहेत. तसेच 12 जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. हे बदल लक्षात घेवून योजनेसाठी अर्ज छाननी आणि ऑनलाईन नोंदणीला गती गती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना गिरी, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांची यावेळी उपस्थिती होती.

सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. जिल्ह्यात आतापर्यंत 81 हजार 225 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 35 हजार 266 अर्ज ऑनलाईन करण्यात आले असून 45 हजार 959 अर्ज ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

योजनेसाठी पात्रतेच्या निकषात करण्यात आलेल्या बदलांबाबत ग्रामीण, शहरी भागात व्यापक जनजागृती करण्यात यावी. तसेच ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक, रेशन दुकानदार, तलाठी, कृषि सहायक, महिला बचतगटातील प्रेरिका (सीआरपी) यांच्यामार्फत नाव नोंदणी आणि प्राप्त अर्जांची छाननी व ऑनलाईन करण्याची प्रक्रिया अधिक गतीने होण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात याव्यात. तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी याबाबत योग्य समन्वय व नियोजन करावे. सर्व संबंधित उपविभागीय महसूल अधिकारी यांनी वेळोवेळी आढावा घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.

ग्रामीण व शहरी भागातील अर्ज स्वीकृती केंद्रात प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या यादीचे नियमितपणे चावडी वाचन करावे. या चावडी वाचनाबाबत दवंडीद्वारे नागरिकांना पूर्वकल्पना द्यावी. चावडी वाचनात नोंदविण्यात येणाऱ्या आक्षेपांचा अहवाल तालुकास्तरीय समितीकडे पाठविण्यात यावा. शासन निर्णयात नमूद केल्यानुसार विविध योजनांच्या लाभार्थी महिलांची गावनिहाय यादी तयार करून त्यांची मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करून घेण्यात यावी. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक महिलांच्या नोंदणीसाठी रास्त भाव दुकानदारांचे सहाय्य घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. नेटके आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेख यांनी तालुकानिहाय प्राप्त अर्जांची माहिती दिली.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु