विशेष लेख :‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिला सशक्तीकरणास मिळणार चालना

 राज्यातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी आणि त्यांच्या सशक्तीकरणास चालना देण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ ही अतिशय महत्वपूर्ण योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला, मुलींना दरमहा 1 हजार 500 रुपये म्हणजेच एका वर्षात 18 हजार रुपये लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे या महिला आणि मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा होण्यासाठी मदत होणार आहे.

राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत आहे, अशा सर्व महिला या याजानेसाठी पात्र  आहे. एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटुंबाच्या व्याख्याते पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले, मुली यांचा समावेश होतो. यामध्ये विवाहित, घटस्फोटीत, विधवा, परितक्त्या, निराधार, कुटुंबातील एक अविवाहित महिला यांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थी महिलेच्या आधार सलंग्न बँक खात्यामध्ये थेट दरमहा जमा केला जाणार असल्याने पात्र महिलांची ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. ऑनलाईन नाव नोंदणीसाठी  नारीशक्ती दूत-Narishakti doot’ हे मोबाईल ॲप कार्यान्वित करण्यात आले असून हे ॲप डाऊनलोड करून वैयक्तिक अर्जदार ऑनलाईन अर्ज भरू शकणार आहेत.

‘मुख्यमंत्री-लाडकी बहीण’ योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. पर्यायी आणि सहज उपलब्ध होणारी कागदपत्रांच्या आधारे अर्ज भरून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत असली तरीही या कालावधीत केव्हाही अर्ज केला तरी पात्र महिलेला 1 जुलै 2024 पासून या याजानेचा लाभ दिला जाणार आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधाही निशुल्क असून या योजनेची अचूक माहिती लाभार्थ्यांना देण्यासाठी तालुकास्तरावर तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद तथा नगरपंचायत याठिकाणी, तसेच जिल्हास्तरावर महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच 181 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 02382-299680 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधून योजनेची अधिक माहिती प्राप्त करून घेता येणार आहे. ऑफलाईन अर्जाचे नमुने निशुल्क स्वरुपात अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शहरी व ग्रामीण भागात विशेष शिबिरांचे आयोजन केले जात असल्याने महिलांना आपल्या घराजवळच योजनेसाठी अर्ज करण्याची सुविधा मिळत आहे. या शिबिरांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज भरून घेण्यासाठी शिबिरे

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रशासनामार्फत शहरी भागात विविध शिबिरे आयोजित करण्यात येत असून गाव पातळीवरही अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याद्वारे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहायक, अंगणवाडी सेविका, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका यांच्यासह अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांच्या समितीवर जबाबदारी देण्यात आली आहे. शहरी भागात अंगणवाडी सेविका, राष्ट्रीय नागरी जीवनोन्नती अभियानचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमख व शहर मिशन व्यवस्थापक, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. महिलांचे ऑफलाईन अर्ज स्वीकारून ते ॲपवर ऑनलाईन भरण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक असून आधारकार्डवरील माहिती प्रमाणेच अर्ज भरणे बंधनकारक आहे. यासोबतच अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म नोंदणी प्रमाणपत्र अथवा महिलेचे 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक दस्ताऐवज सोबत जोडावा. तसेच उत्पन्नाचा दाखला अथवा पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड सोबत जोडावे. नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदाराचे विहित नमुन्यातील साध्या कागदावरील हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो. आवश्यक आहे. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र यापैकी कोणताही एक दस्तऐवज ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच या योजनेसाठी पोस्टातील बँक खातेही ग्राह्य मानले जाणार आहे.

-         तानाजी घोलप,

प्र. जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु