‘लातूर हरितोत्सव’मध्ये आबालवृद्धांनी केली रोपांची खरेदी !








 वृक्षदिंडीतून बालगोपाळांनी सांगितले ‘एक एक झाड लावू ममतेनं...’

·       लहानग्यांची पसंती फळझाडांना, गृहिणींच्या दिसली हाती औषधी, फुलझाडे

·       खासगी रोपवाटिका, वनविभागाच्या स्टॉलवर रोपांच्या खरेदीसाठी गर्दी

लातूर, दि. 14 :  शहरातील आणि परिसरातील नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीसाठी जनजागृती करून त्यांना एकाच ठिकाणी विविध प्रजातीच्या झाडांची रोपे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, पर्यावरण प्रेमी संघटना आणि व्यापारी संघाच्यावतीने ‘लातूर हरितोत्सव’चे आयोजन करण्यात आले होते. पहिल्यांदाच होत असलेल्या या अभिनव उपक्रमात सहभागी होत आबालवृद्ध लातुकारांनी पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सामील होत वृक्ष लागवडीचा निर्धार केला. यासाठी आपापल्या आवडीच्या झाडांची रोपे खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

‘लातूर हरितोत्सव’ची सुरुवात सकाळी वृक्षदिंडीने झाली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते वृक्षदिंडीला सुरुवात झाली. यामध्ये विविध शाळांच्य विद्यार्थ्यांसह शहरातील पर्यावरण प्रेमी संघटनांनी आणि नागरिकांनी सहभाग घेतला. ‘एक एक झाड लावू ममतेनं, फुलवूया रान सारं हिमतीनं...’या गीताच्या माध्यमातून वृक्षदिंडीतील बालगोपाळांनी वृक्ष लागवडीचे आवाहन केले. तसेच वारकऱ्याच्या वेशभूषेत दिंडीत सहभागी झालेल्या नागरिक आणि ज्ञानप्रकाश संकुलच्या विद्यार्थ्यांनी ‘विठ्ठल विठ्ठला... झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश दिला.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, उप विभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव, आर. एन. काळे यांनीही टाळ-मृदुंगाच्या तालावर दिंडीत विठ्ठल नामाचा जयघोष करीत ठेका धरला. तर या दिंडीत सहभागी झालेल्या महिलांसह उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी फुगडीमध्ये सहभाग घेतला. दयानंद कला महाविद्यालयाच्या चमूने यावेळी वृक्ष लागवडीचे महत्व पटवून देणारे पथनाट्य सादर करून उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचे आवाहन केले.

लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, सहायक वनसंरक्षक वैशाली तांबे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी अमिताराज जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, महानगरपालिका उपायुक्त शुभम क्यातमवार, नायब तहसीलदार परवीन पठाण, शिक्षण विभागाचे मधुकर ढमाले, सतीश नरहरे, डॉ. संदीपन जगदाळे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, ग्रीन लातूर संघटना, वसुंधरा प्रतिष्ठान, लातूर वृक्ष टीम आदी पर्यावरण संघटनांचे पदाधिकारी  यावेळी उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यातील वृक्षाच्छादन अतिशय कमी आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप येणे गरजेचे आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘माझं लातूर, हरित लातूर’ या मोहिमेंतर्गत ‘हरितोत्सव 2024’ उपक्रम आयोजित केला होता. गंजगोलाई ते हनुमान मंदिर चौक परिसरात वन विभाग आणि खासगी रोपवाटिकांचे रोपांचे प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये औषधी वनस्पती, शोभेची झाडे, परसबागेमध्ये लावण्यायोग्य झाडे, फळझाडे व फुलझाडांची रोपे, वृक्षारोपणासाठी आवश्यक सेंद्रिय खते, कुंड्या व इतर आवश्यक साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. तसेच मिलेटसपासून तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी महिला बचतगटांचे स्टॉल उभारण्यात उभारण्यात आले होते.

जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सागर यांच्या उपस्थित वृक्ष लागवडीने ‘लातूर हरितोत्सव’ला प्रारंभ झाला. सकाळपासूनच लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत होता. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सर्व स्टॉलला भेटी देवून तेथे आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. तसेच त्यांना वृक्ष लागवडीचे आवाहन केले.

 रविवारची सुट्टी असल्याने अनेकजण आपल्या परिवारासह या उपक्रमात उपस्थिती लावून रोपवाटिकांच्या स्टॉलवर रोपांची खरेदी करीत होते. यामध्ये लहान मुले आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आपल्या आवडीची रोपे खरेदी करण्याकडे त्यांचा कल होता. यामध्ये लहान मुले फळांची आणि महिला तुळस, आवळा, कोरफड या औषधी वनस्पतींसह फुलझाडांची रोपे खरेदी करण्यास पसंती देत असल्याचे दिसून आले. तसेच अनेकजण आपल्या शेतामध्ये, अंगणात लावण्यासाठी चिंच, कडूनिंबाची रोपे खरेदी करीत असल्याचे दिसून आले. दुपारी काहीकाळ पावसाने हजेरी लावल्यानंतर पुन्हा सायंकाळी नागरिकांनी रोपे खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.

वन, कृषी विभागामार्फत वृक्ष लागवडीबाबत जनजागृती

वृक्ष लागवडीविषयी माहिती देण्यासाठी, तसेच सवलतीच्या दरात रोपे विक्रीसाठी खासगी रोपवाटिकांसह वन विभागाच्या लातूर, अहमदपूर आणि निलंगा परिक्षेत्र आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत स्टॉल लावण्यात आले होते. सहायक वनसंरक्षक वैशाली तांबे, सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी अमितराज जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे, अश्विनी अपेट, निलेश बिराजदार यावेळी उपस्थित होते. लातूर हरितोत्सवमध्ये कृषी विभागाच्या फळरोपवाटिकांचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच पौष्टिक तृणधान्य लागवडीबाबतही कृषि विभागामार्फत जनजागृती करण्यात आली.

भावी पिढीसाठी ऑक्सिजन बँक तयार करण्यासाठी वृक्ष लागवड करा : जिल्हाधिकारी

वृक्ष लागवड मोहिमेला गती देण्यासाठी आयोजित ‘लातूर हरितोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहीम गतिमान करून आपल्या भावी पिढीला वृक्षांचा वारसा देवून त्यांच्यासाठी ऑक्सिजन बँक तयार करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होवून एक व्यक्ती-एक झाड या संकल्पनेतून वृक्ष लागवड करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. तसेच ‘लातूर हरितोत्सव’ आयोजनात सहभाग नोंदविणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु