लातूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 1 जानेवारी पासून ‘प्रत्येक बुधवार, वृद्धासाठी’ उपक्रम राबवा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात
1 जानेवारी पासून ‘प्रत्येक बुधवार,
वृद्धासाठी’ उपक्रम राबवा
- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
·
जिल्ह्यात नवीन 7
ठिकाणी होणार ‘आपला दवाखाना’
·
आरोग्य केंद्रात
रुग्णाच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध होणार किचन सुविधा
लातूर, दि. 19 (जिमाका) : एक जानेवारीपासून लातूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘प्रत्येक बुधवार, वृद्धांसाठी...’ उपक्रम राबवून हा दिवस प्राधान्याने वृद्धाच्या आरोग्य तपासणीसाठी ठेवावा. वृद्धाचे आरोग्य ही आपली जबाबदारी आहे, त्यामुळे हे काम अत्यंत तळमळीने व्हावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियामक समिती राष्ट्रीय आरोग्य अभियान यासह आरोग्य विषयक बाबींच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य रुग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्यासह आरोग्य विभागाच्या विविध शाखाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील आरोग्य सुविधा ही जनतेची मूलभूत गरज आहे, हे लक्षात ठेवून काम करावे, प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी याबाबतीत मोठी आहे. त्यामुळे 1 जानेवारी पासून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आठवड्यातला प्रत्येक बुधवार हा वृद्धाच्या तपासणीचा असेल. वयांमुळे अनेक व्याधी मागे लागलेल्या असतात त्यासाठी त्यांची रुटीन तपासणी होणे गरजेचे आहे. तपासणी नंतर त्यांना आवश्यक असलेले औषध द्यावी. औषधे वेळेवर कशी घ्यायची हे समजावून सांगावे, ते आपले कर्तव्य आहे, याची जाणीव सर्व डॉक्टर्सनी ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी केल्या.
लिंग गुणोत्तर वाढविणे आणि माता
मृत्यू दर कमी करणे
जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर दर हजारी
पुरुषांमागे 946 स्त्री एवढे असले तरी रेणापूर आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हे प्रमाण
इतर तालुक्याच्या तुलनेत कमी आहे. त्यावर अत्यंत सखोल चौकशी होऊन हे प्रमाण
वाढविण्यासाठी जिल्हा स्तरावरील यंत्रणानी विशेष लक्ष द्यावे. जेणे करून प्रत्येक
तालुक्यातील लिंग गुणोत्तर हे राष्ट्रीय मानकानुसार व्हावे, याची दक्षता घ्यावी, अशा
सक्त सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. तसेच माता मृत्यूचे प्रमाण कमी
करण्यासाठी गरोदर मातांचा आहार, तिचे औषधं, तिच्या वेळच्या वेळी आवश्यक त्या तपासणी होतायत का याची
पाहणी आरोग्य यंत्रणाकडून व्हावी, असे आदेशही जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी
दिले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात किचन
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात
दाखल झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकाला एक दोन दिवस आरोग्य केंद्रात राहावे लागले, तर
तिथे जेवण तयार करायला मूलभूत सोयीसह कीचन उभं करावे. जेणे करून गरिब रुग्णाला
जेवणासाठी पायपिट करण्याची वेळ येणार नाही, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी
दिल्या.
जिल्ह्यात
नवे सात ‘आपला दवाखाना’ मंजूर
जिल्ह्यातील नागरी भागासाठी सात ‘आपला
दवाखाना’ मंजूर झाले असून त्यासाठी नगरपालिका, नगरपंचायत मुख्याधिकारी आणि तालुका
अधिकारी यांनी जागांची संयुक्त पाहणी करून जागा निश्चित करण्याच्या सूचना
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. याकामी कोणतीही अडचण आली तर जिल्हा
यंत्रणाशी समन्वय साधावा असे सांगितले.
क्षयरुग्णाच्या आहारासाठी स्वयंसेवक संघटनांनी
पुढे येण्याचे आवाहन
क्षयरोग कमी करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे.
क्षयरोगामध्ये पोषण आहार ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी जिल्ह्यातील
दानशूर व्यक्ती, संस्था यांनी क्षयरुग्णासाठी लागणारे फूड बास्केट पूरवावेत. त्यासाठी
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. तांबारे (भ्रमणध्वनी क्र. 8624946243), तिसरा मजला, शासकीय मध्यवर्ती इमारत यांच्याशी
संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
******
Comments
Post a Comment