‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 411 गावांमध्ये झाला शासकीय योजनांचा जागर

 



·        26 जानेवारीपर्यंत लातूर जिल्ह्यात विविध गावांमध्ये जाणार यात्रा

·        आतापर्यंत 4 लाख 98 हजार नागरिकांचा सहभाग

·        शासकीय योजनांसाठी नावनोंदणीसह, नागरिकांची आरोग्य तपासणी

लातूर, दि. 18 (जिमाका) : केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचवून त्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित केलेली ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ जिल्ह्यामधील गावागावामध्ये जावून जनजागृती करीत आहे. 24 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सुरु झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेने आतापर्यंत जिल्ह्यातील 411 गावांना भेट दिली असून या गावांमधील 4 लाख 98 हजार 124 नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. या उपक्रमांतर्गत विविध योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासोबतच नागरिकांची आरोग्य तपासणीही केली जात आहे. 26 जानेवारी 2024 पर्यंत ही यात्रा सुरु राहणार आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान गावोगावी जावून प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे.

जिल्ह्यातील 4 लाख 98 हजार 124 नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सहभाग नोंदविला आहे. यावेळी आयोजित आरोग्य शिबिरांमध्ये 92 हजार 349 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच 70 हजार 588 नागरिकांची क्षयरोग तपासणी करण्यात आली आहे. 303 ठिकाणी स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी प्रात्याक्षिके आयोजित करण्यात आली होती. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी 2 हजार 172 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित उपक्रमात नैसर्गिक शेती करणाऱ्या 343 शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला असून महिला लाभार्थी, विद्यार्थी, खेळाडू यांचा सन्मान करण्यात आला आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा