लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली निघाला 1977 चा दावा !

 विशेष वृत्त

लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये

निकाली निघाला 1977 चा दावा !

·        फिर्यादीच्या नातवाद्वारे तडजोडीने दावा निकाली

·        जिल्ह्यात एकूण एक हजार 27 दावे निकाली

·        यु.के.मधील साक्षीदाराने नोंदविली ऑनलाईन साक्ष

लातूर, दि. 10 (जिमाका) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने रविवारी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 1977 मध्ये दाखल झालेला एक दावा तडजोडीने सोडविण्यात आला. तसेच एकूण एक हजार 27 दावे निकाली काढण्यात आले.

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात, नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक न्यायालय, व ग्राहक मंच प्रकरणे, भू-संपादन, 138  एन.आय. अॅक्ट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणे, लवाद, हिंदू विवाह कायदाअंतर्गत प्रकरणे व कोर्टात प्रलंबित असलेली तडजोड पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. तसेच वादपुर्व प्रकरणामध्ये सर्व बँकांची वसुली दावे, वित्त संस्था तसेच भ्रमणध्वनी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड यांची रक्कम वसुली बाबतची प्रकरणे ठेवण्यात आलेली होती.

सन 1977 मध्ये दोन गाढव चोरीच्या प्रकरणामध्ये दाखल दावा आरसीसी क्र. 1356/1977 राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात आले. यामध्ये फिर्यादिच्या नातवाद्वारे करण्यात आलेल्या तडजोडीने हे प्रकरण निकाली काढण्यात आले. इन्श्योरन्स कंपन्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. इफ्को-टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनीच्या एम.ए.सी.पी. क्र. 1/2023 या प्रकरणात 16 लाख 90 हजार रुपयांमध्ये तडजोड करण्यात आली. या प्रकरणात अर्जदाराचे वकील अॅड. एस. एस. हुले व प्रतिवादीचे वकीलअॅड. एस. जी. डोईजोडे यांनी काम पाहिले. या पॅनलवर पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश-3 डी. बी. माने लातूर व पॅनल पंच म्हणून अॅड. आर. आर. डांगे यांनी काम पहिले. तसेच  इतर इन्शुरन्स कंपन्यांचे वकील यांनी राष्ट्रीय लोकअदालतीला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

विशेष दिवाणी दावा 225//2023 या प्रकरणामध्ये दिव्यांग अर्जदाराच्या दिवाणी प्रकरणामध्ये रागद्वेषातून झालेली भांडणं सामोपचाराने मिटविले व हा दावा तडजोडी निकाली काढण्यात आला. या प्रकरणात अर्जदारातर्फे पठाण बरकत आय व प्रतिवादीतर्फे ए. एम. शेख यांनी काम पाहिले. या पॅनलवर सह. दिवाणी न्यायाधीश व. स्तर एस. एन. भोसले आणि पॅनल मेंबर अॅड. ए. सी. घेवारे यांनी काम पाहिले.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात आला. त्यामुळे यु. के. या देशात स्थायी असलेले पक्षकार यांची व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे उपस्थिती नोंदविण्यात आली. संक्षिप्त फौजदारी खटला क्र. 1585/2020 या प्रकरणामध्ये 1 लाख 81 हजार  500 रुपये इतक्या रकमेची तडजोड झाली. या प्रकरणामध्ये अर्जदाराचे वकिल अॅड. येरटे शांतेश्वर एम. आणि प्रतिवादीतर्फे अॅड. एम. एफ. पटेल यांनी काम पहिले. या पॅनलवर दुसरे सह दिवाणी न्यायाधीश व स्तर. जे. सी. डेंगळे व पॅनल पंच अॅड. एस. पी. रणदिवे यांनी काम पाहिले.

तसेच या लोकअदालतीमध्ये पॅनल वर अॅड. एस. पी फड, अॅड. आर. आर. डांगे, अॅड. ए. सी. घेवारे, अॅड. एस. पी. रणदिवे, अॅड. टी. एन. इटकरी, अॅड. ए. एस. जोशी, अॅड. एम. ए. काझी, अॅड. यु. एन. राऊत, यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले.

लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव एस. डी. अवसेकर सर्व न्यायाधीश, बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अॅड. आण्णाराव जी. पाटील, जिल्हा वकिल मंडळाचे अध्यक्ष अॅड, महेश बामनकर, उपाध्यक्ष गजानन यु. चाकुरकर, सचिव अॅड. प्रदिपसिंह टी. गंगणे, महिला सचिव हर्षला जी. जोशी व इतर पदाधिकारी तसेच जिल्हा सरकारी वकील मंडळ, लातूर व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा