विकसित भारत संकल्प यात्रेचे नियोजनबद्ध कार्यक्रम,  संकेतस्थळावर अपलोड करण्यात लातूर राज्यात सर्वोत्तम

     - केंद्रीय सहसचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा

औसा तालुक्यात
बाराशे किलोमीटरपेक्षा अधिकचे शेतरस्ते 

- आ. अभिमन्यू पवार

लातूर, दि. 22 (जिमाका):

सर्वसामान्यांना केंद्र सरकारच्या योजनांची सविस्तर माहिती मिळावी व त्याचा लाभ घेता यावा, यासाठी गावोगावी विकसित भारत संकल्प यात्रा जात आहे. लातूर जिल्ह्यातील संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाचे नियोजन अतिशय उत्तम होत असून झालेल्या कार्यक्रमाचे छायाचित्र, रिपोर्ट केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात राज्यात लातूर सर्वोत्तम असल्याची माहिती केंद्रीय वस्रोद्योग मंत्रालयाच्या सहसचिव प्राजक्ता लवंगारे - वर्मा यांनी दिली. औसा तालुक्यातील तावशी ताड येथे  विकसित भारत संकल्प यात्रेच्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

आमदार अभिमन्यू पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, तहसीलदार भारत सूर्यवंशी, गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे, गावच्या सरपंच रमा कांबळे उपस्थित होत्या.


औसा तालुक्यात झालेलं शेतरस्त्याचे काम असेल किंवा विविध योजनांचे कन्व्हर्जन करून विकास कामे करण्याची संकल्पना उत्तम असल्याचे सांगून भारत सरकारचा वस्रोद्योग विभागही कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी इतर विभागांबरोबर कन्व्हर्जन करून प्रकल्प करत असल्याचे श्रीमती लवंगारे-वर्मा सांगितले. विकसित भारत संकल्प यात्रेतून लोककल्याणाच्या योजना गावापर्यंत पोहचवायच्या आहेत. नवनवीन विकसित तंत्रज्ञान गावापर्यंत पोहचावे, म्हणून शेतीची फवारणी करणारे ड्रोन त्याची माहिती, प्रात्याक्षिक दाखविले जात आहेत. या सर्व योजनांची माहिती नागरिकांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

    


माजी राष्ट्रपती ए.पी. जे. अब्दुल कलाम याच्या स्वप्नांतील विकसित भारत करण्यासाठी मागच्या काही वर्षातील कामे पाहून 2047 पर्यंत आपण विकसित भारताचे स्वप्न साकार करू, असे सांगून विकसित संकल्प यात्रा गावोगावी जाऊन कल्याणकारी योजनांची माहिती सांगत आहे. या योजना लोकं समजून घेत आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात लाभही घेत असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी औसा तालुक्यात जवळपास 1 हजार 200 किमी एवढ्या लांबीचे शेतरस्ते केल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला. केवळ शेतरस्ते नाहीत म्हणून खरीपाच्या राशी रब्बी बरोबर कराव्या लागायचे ते चित्र आता बदलल्याचे आमदार श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

 यावेळी लाभधारकांना आधारकार्ड वाटप, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतागृहासाठी सात लाभार्थ्यांना अनुदानाचे धनादेश, चार बचतगटांना कर्ज वाटपाचे धनादेश देण्यात आले. याठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलची पाहणी श्रीमती लवंगारे-वर्मा, आमदार श्री. पवार यांनी केली. प्रारंभी संकल्प यात्रेतील एलईडी व्हॅनचे फीत कापून उदघाटन करण्यात आले.

शिरूर अनंतपाळ येथील कार्यक्रमाला भेट


शिरूर अनंतपाळ शहरामध्ये विकसित संकल्प भारत चित्ररथ शुक्रवारी सकाळी पोहोचला. यावेळी विद्यार्थी, लाभार्थी व नागरिक यांनी पुष्पवृष्टी करून चित्ररथाचे स्वागत केले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहसचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी या कार्यक्रमाला भेट देवून उपक्रमाची पाहणी केली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निलंगाच्या उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, नगराध्यक्ष मायावती गणेश धुमाळे, नगरपालिका प्रशासनचे सहआयुक्त रामदास कोकरे, तहसीलदार काशिनाथ पाटील, गट विकास अधिकारी श्री. चव्हाण, नगरपंचायत मुख्याधिकारी मंगेश शिंदे, उपनगराध्यक्ष सुषमा बस्वराज मठपती याची यावेळी उपस्थिती होती.


विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रम राबविण्यात येत असून एकही पात्र व्यक्ती शासकीय योजनेपासून वंचित राहू नये, याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी केले.

प्रारंभी विकसित भारत संकल्प यात्रा चित्ररथाचे फीत कापून उदघाटन करण्यात आले. तसेच आत्मनिर्भर व विकसित राष्ट्र बनविण्याची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण कोरे यांनी केले.

*****






Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा