एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24 राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24
राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी
31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. 20 (जिमाका): जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादनइ विकास अभियान सन 2023-24 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत राज्याबाहेर अभ्यास दोऱ्याअंतर्गत प्रक्षेत्र भेटीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना इतर राज्यातील शेती उद्योगाची माहिती व्हावी, यासाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी केले आहे.
शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया, उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास करण्यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करून देणे व या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतःची व त्याचबरोबर समूहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे हा राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्याचा उद्देश आहे.
अभ्यास दौरा राबवताना भेटीच्या ठिकाणांमध्ये परराज्यातील कृषी विद्यापीठ, राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र फलोत्पादन क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या खाजगी कंपन्या, संस्था कृषी विज्ञान केंद्र, फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, विदेशी फळपिक लागवड आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेता येईल. अभ्यास दौऱ्याचा कालावधी हा जास्तीत जास्त 7 दिवसांचा राहील. यामध्ये प्रवास खर्च निवास व भोजन व्यवस्था, प्रशिक्षण साहित्य इत्यादी बाबींचा समावेश राहील. प्रति लाभार्थी ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा जादा लागणारा खर्च लाभार्थ्याला स्वत: करावा लागेल. या अभ्यास दौऱ्याअंतर्गत महिला किंवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटातील सदस्यांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे.
अभ्यास दौऱ्यासाठी फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, फुले लागवड करणाऱ्या, शेडनेट गृह व हरितगृह उभारणी, फळ प्रक्रिया इत्यादीबाबत इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यात आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. लाडके यांनी केले आहे.
******
Comments
Post a Comment