प्रत्येकाने ग्राहक संरक्षण कायदा जाणून घेण्याची गरज - अमोल गिराम
·
राष्ट्रीय ग्राहक
दिन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
·
विविध शासकीय
योजनांविषयी जनजागृती
लातूर, दि. 28 (जिमाका): प्रत्येक
व्यक्ती हा जन्मापासून ते मृत्युपर्यंत ग्राहक असतो. त्यामुळे त्याला ग्राहक
म्हणून आपल्याला मिळालेल्या हक्कांची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने
ग्राहक संरक्षण कायदा जाणून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार
निवारण आयोगाचे अध्यक्ष अमोल गिराम यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित
कार्यक्रमात ते बोलत होते.
निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा पुरवठा अधिकारी
प्रियांका आयरे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या सदस्य रेखा जाधव, रवींद्र
राठोडकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मिरकले पाटील, ग्राहक
पंचायतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रल्हाद तिवारी, प्रांत ग्राहक संरक्षणचे राष्ट्रीय
अध्यक्ष राजेश भोसले, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य गीता मोरे, रंजना
मालुसरे, शिवशंकर रायवाडे, निपुण शेंडगे, सतीश देशमुख, तहसीलदार सौदागर तांदळे, विधिज्ञ
एस. व्ही. तापडिया, आसिफ पटेल यावेळी उपस्थित होते.
ग्राहक संरक्षण कायदा हा व्यापक सामाजिक दृष्टीकोनातून
बनविण्यात आलेला कायदा आहे. या कायद्यांतर्गत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे
दाखल प्रकरणात तक्रारदाराला स्वतः आपली बाजू मांडण्याची संधी मिळते. या कायद्याची
प्रक्रिया अतिशय सहज, सोपी असून प्रत्येक ग्राहकाने हा कायदा समजून घ्यावा. या कायद्याचे
ज्ञान मिळाल्यास फसवणुकीच्या विरोधात आवाज उठविणे शक्य होणार आहे. त्यामुळे हा
कायदा समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे
आवश्यक असल्याचे श्री. गिराम यावेळी म्हणाले. तसेच आता ई-कॉमर्स, ई-ट्रेडिंगमध्ये होणाऱ्या
फसवणुकी विरुद्धही ग्राहक या कायद्यांतर्गत दाद मागू शकतो. या कायद्यांतर्गत अतिशय
जलद न्याय मिळतो, असे त्यांनी सांगितले.
ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना अनेक हक्क प्राप्त झाले
असून या हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक दिन दरवर्षी साजरा
करण्यात येत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती आयरे यांनी प्रास्ताविकात
सांगितले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मिरकले पाटील,
ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रल्हाद तिवारी, प्रांत ग्राहक संरक्षणचे
राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य रंजना
मालुसरे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच विधिज्ञ श्री. तापडिया, श्री.
पटेल यांनी ग्राहक संरक्षण अधिनियमाबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
प्रारंभी फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय
ग्राहक दिनानिमित्त विविध शासकीय विभागांमार्फत योजनांची माहिती देण्यासाठी
लावण्यात आलेल्या स्टॉलची मान्यवरांनी पाहणी केली. लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे
यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*****
Comments
Post a Comment