प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता नको, एसटीमध्ये मिळणार डिजीटल प्रणालीद्वारे तिकिट - युपीआय, क्युआर कोड, सुविधा उपलब्ध
प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता नको, एसटीमध्ये मिळणार डिजीटल प्रणालीद्वारे तिकिट
- युपीआय, क्युआर कोड, सुविधा उपलब्ध
लातूर, दि. 13 (जिमाका) : एसटीतून प्रवास करतांना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्टया पैशांची चिंता नको.. एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत डिजीटल प्रणालीद्वारे तिकिट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सर्व वाहकांसाठी ॲन्ड्राईड तिकिट इश्यू मशिन्स (ईटीआयएम) नव्याने एस.टी.च्या सेवेत दाखल झाल्या आहेत. नव्या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआरकोड आदी डिजीटल पेमेंटचा वापर करीत तिकिट काढता येणार आहे, असे राज्य परिवहन महामंडळाचे लातूर विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.
डिजीटल व्यवहाराला चालना देणे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यादृष्टीकोनातून एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकिट काढण्यासाठी युपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आता वाहकाकडे असलेल्या ॲन्ड्राईड तिकिट मशीनवरील असलेल्या क्युआरकोडद्वारे प्रवाशांना तिकीटाचे मोजके पैसे डिजीटल स्वरुपात देणे शक्य होणार आहे. प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत, म्हणून एसटीने प्रवास करणे टाळणे, तसेच सुट्ट्या पैशासाठी वाहकासोबत होणारा विनाकारण वाद, असे प्रश्न कायमचे मिटू शकतील. युपीआय पेमेंटद्वारे क्युआरकोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये तिकिट विक्री सुरु केली असून जास्तीत जास्त प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा , असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment