विशेष लेख_योजना ‘सारथी’च्या...._
*‘सारथी’मार्फत दिले जाते ड्रोन पायलट प्रशिक्षण*
• कृषि यांत्रिकीकरणाला मिळणार गती
*राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली. 'शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ हे ब्रीद घेवून काम करणाऱ्या ‘सारथी’ संस्थेमार्फत विविध कल्याणकारी उपक्रम व योजना राबविण्याचे काम केले जात असून या योजनांच्या माहितीवर आधारित क्रमशः लेखमालेचा हा सहावा भाग...*
शेतीमध्ये तंत्रज्ञान,
यांत्रिकीकरणाचा वापर वाढविनियासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून
प्रोत्साहनात्मक अनुदान देत आहे. ड्रोनद्वारे विविध खरिप, रब्बी, फळपिके तसेच भाजीपाला
पिकावर किटकनाशकाची फवारणी सुलभरित्या करता येते. मात्र, यासाठी योग्यरित्या ड्रोन
चालवू शकतील, असे प्रशिक्षित मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात आज उपलब्ध नाही. त्यामुळे शेती
क्षेत्रातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील
युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध देण्यासाठी ‘सारथी’मार्फत ड्रोन पायलट प्रशिक्षण
देण्यात येत आहे.
राज्यातील कृषि विद्यापीठांतर्गत
डीजीसीए मान्य प्रशिक्षण केंद्र चालविले जाते. त्यानुसार ‘सारथी’मार्फत देणारे ड्रोन
पायलट प्रशिक्षण राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात स्थापित झालेल्या रिमोट
पायलट प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेले आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 7 दिवसांचा
असून यामध्ये 5 दिवस ड्रोन चालविण्याचे आणि 2 दिवस फवारणीचे प्रशिक्षण देण्यात येते.
प्रत्येक महिन्यामध्ये या केंद्रावर एकावेळी 40 जणांना असे प्रशिक्षण दिले जाते.
*प्रशिक्षणासाठी असे आहेत पात्रतेचे निकष*
प्रशिक्षणार्थी लाभार्थीचे
वय 18 ते 40 वर्षे असावे. तसेच तो कृषी पदवीधर अथवा कृषी पदविकाधारक असावा. या विषयातील
पुरेसे अर्जदार उपलब्ध न झाल्यास अन्य विषयांचे पदवीधरांचा विचार करण्यात येतो. प्रशिक्षणार्थीच्या
कुटुंबाचे मागील तीन वर्षाचे वार्षीक उत्पन्न हे 8 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे अथवा
सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र (ईडब्लूएस) असावे. तसेच त्याच्याकडे
वैध पासपोर्ट असावा. वैद्यकीय योग्यता प्रमाणपत्र आवश्यक असून प्रशिक्षणार्थी हा शेतकरी
कुटुंबातील असावा.
*कधी आणि कुठे अर्ज करावा*
प्रशिक्षणासाठी विहित
नमुन्यातील ऑनलाईन अर्ज https://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ड्रोन
प्रशिक्षण केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याकडे देखील रितसर ऑनलाईन
अर्ज करावा. या प्रशिक्षणासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून 31 मार्च 2024
पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
- *तानाजी घोलप,* माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, लातूर
*****
Comments
Post a Comment