वैश्विक प्रमाणपत्र शिबिरात 90 दिव्यांगांची तपासणी
वैश्विक प्रमाणपत्र शिबिरात 90 दिव्यांगांची तपासणी
· जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दोन दिवसीय शिबीर
· जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील शिबिराचा आज होणार समारोप
लातूर, दि. 04 (जिमाका) : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त लातूरात दिव्यांगाच्या वैश्विक प्रमाणपत्राचे शिबीर सोमवारी घेण्यात आले. यामध्ये 90 दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण विभाग व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवसीय वैश्विक प्रमाणपत्र (युडीआयडी कार्ड) नोंदणीचे शिबीर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात सुरू आहे.
शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड बंधनकारक असल्याने दिव्यांगासाठी युडीआयडी कार्ड महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवार पर्यंत चालणार आहे. या शिबिरात दिव्यांग व्यक्तींची विविध तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येत आहे. अस्थिरोग, बालरोग, मानसोपचार व नेत्ररोग तज्ज्ञांचा यामध्ये समावेश असून यांच्या सल्ल्याने वैश्विक कार्डची नोंदणी होत आहे.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, संवेदना प्रकल्पाचे डॉ योगेश निटूरकर, वेंकट लामजणे, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे बसवराज पैके,शितल सूर्यवंशी, नवाज शेख, परमेश्वर सोनवणे, बाळासाहेब गंगणे,अनुप दबडगावकर, डॉ तळीखेडकर, किरण कचकुटे यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील कर्मचारी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त दिव्यांगानी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment