जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात आता तंबाखू खाण्यावर प्रतिबंधासाठी विशेष मोहिम
जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात आता तंबाखू खाण्यावर प्रतिबंधासाठी विशेष मोहिम
लातूर, दि. 19 ( जिमाका) : जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या आवती भोवती सगळीकडच्या भिंती, कोपरे, प्रसाधन गृह, तिथले वॉश बेशीन तंबाखूच्या पिचकारीने आणि तंबाखूने भरलेले काही ठिकाणी तुंबलेले असे अत्यंत वाईट चित्र आहे. ही बाब आपण लातूरकरांसाठी अजिबात भूषणावह नाही. यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांनीही माझ्या ऑफिसमध्ये आणि आसपास कोणीही तंबाखू खाणार नाही, अशी सक्त ताकीद दिली तर हे चित्र बदलायला वेळ लागणार नाही. त्यासाठी आता 'माझं ऑफिस नो टोबॅको झोन' असेल अशी विशेष मोहिम प्रत्येक कार्यालयाच्या प्रमुखांनी राबविण्याचा निर्धार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी केले.
जिल्हा नियामक समिती राष्ट्रीय आरोग्य अभियान यासह आरोग्य विषयक बाबींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. या बैठकीला उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हातील ग्रामीण आरोग्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर यांच्यासह आरोग्य विभागाच्या विविध शाखाचे अधिकारी उपस्थित होते.
शासकीय कार्यालयात आणि कार्यालय परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाण्यावर प्रतिबंध असून याचे उल्लंघन करणाऱ्याला 200 रुपये दंड आहे. पण कोणतेही कार्यालय या नियमाच्या बाबतीत कडक अंमलबजावणी करताना दिसत नाही. लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात तंबाखू खाऊन भिंती, कोपरे तंबाखूच्या पिचकारीने भरलेले दिसतात. ही बाब अत्यंत गंभीर असून याबाबतीत सर्व कार्यालय प्रमुखांना लेखी कळविले आहे. मात्र यावर कोणीही गंभीरपणे कारवाई करताना दिसत नाही. यापुढे ही बाब आपण अत्यंत गांभिर्याने घेत असून तंबाखू प्रतिबंधासाठी यापुढे कार्यालय प्रमुख म्हणून आपण कोणती कार्यवाही केली, याचा आढावा घेणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयप्रमुखांना सांगितले.
****
Comments
Post a Comment