बसवंतपूरमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेला प्रतिसाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
बसवंतपूरमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेला प्रतिसाद
जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना
शासकीय योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न
- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर, दि. 11 (जिमाका) : केंद्र शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ जिल्ह्यातील नागरिकांना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती देण्यासोबतच वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यावर भर देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
बसवंतपूर येथे विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे बोलत होत्या. जिल्हा नगरपालिका प्रशासनाचे सह आयुक्त रामदास कोकरे, सरपंच पावन जाधव, लातूर शहर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील, रुक्मानंद वडगावे, लक्ष्मण जाधव, ग्रामसेवक शंकर भोसले यावेळी उपस्थित होते.
विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना केंद्र शासनाच्या योजनांची चित्ररथाच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे. त्यासोबतच अद्याप लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांची नाव नोंदणीही करण्यात येत असून यामाध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून दीनदयाळ अंत्योदय योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, उज्ज्वला योजना आदी योजनांची माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात आले.
******
Comments
Post a Comment