शैक्षणिक वर्षे सन 2023-24 करिता विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

शैक्षणिक वर्षे सन 2023-24 करिता

विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

लातूर, दि. 29 (जिमाका):-   जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी केले आहे. यासाठी तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायातील मुलांना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती व इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फी योजनाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेतंर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येतो. सन 2019-20 पासून इतर मागास प्रवर्ग व तसेच विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती  इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली आहे. या योजनेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करणे, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे तथा गरजू विद्यार्थ्यांना लेखन शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे आहे. तरी 

चालू शैक्षणिक वर्षे सन 2023-2024 करिता सर्व मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी बँक खाते उघडून या योजनेचा लाभ घ्यावा. यामध्ये काही अडचणी आल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक तथा जिल्हा समाज कल्याण विभाग यांच्याशी संपर्क साधावा. चालू शैक्षणिक वर्षे सन 2023-2024 या वर्षातील सर्व पात्र मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रस्ताव संकलन करण्यासाठी तालुकास्तरीय एक दिवसीय शिबिराचे अयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार लातूर, अहमदपूर, चाकूरकरिता 9 जानेवारी, 2024 रोजी, शिरुर अनंतपाळ, उदगीर, औसा व देवणीकरिता  11 जानेवारी, 2024 तर जळकोट, रेणापूर, निलंगाकरिता 13 जानेवारी, 2024 रोजी शिबिराचे आयोजन करण्याबाबत संबंधित शाळांना गट शिक्षण अधिकारी कार्यालयस्तरवरून पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. यासाठी सर्व मुख्याध्यापक यांनी आवश्यक आधार संलग्न बँके खाते क्रमांक व तत्सम आवश्यक माहिती विद्यार्थ्यांकडून संकलित करुन परिपूर्ण प्रस्ताव विहीत नमुन्यात गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रति स्वाक्षरीसह हार्ड व सॉफ्ट कॉपीसह शाळास्तरावर तयार करावेत. तसेच हे प्रस्ताव विहीत कलावधीत गट शिक्षणाधिकारी कार्यालयस्तरावरुन जमा करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा