जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे 15 ऑगस्ट रोजी आयोजन
जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे 15 ऑगस्ट रोजी आयोजन
लातूर, दि. 10 (जिमाका) : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा अंतर्गत रानभाज्यांचे महत्व पटवून देणे व विपणन साखळी निर्माण करण्यासाठी 15 ऑगस्ट, 2024 रोजी लातूर शहरातील औसा रोडवरील कल्पतरु मंगल कार्यालय येथे सकाळी 10 ते 5 दरम्यान रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार असून तालुकास्तरावर 9 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये रानभाजी महोत्सव होणार आहेत.
या महोत्सवामध्ये रानभाज्या व रानफळांची वैशिष्ट्ये, गुणधर्म व आरोग्यासाठी उपयोग, रानभाजी संवर्धन पद्धती, भाजीची पाककृती (रेसिपी) याची सचित्र माहिती, रानभाज्यांची तांत्रिक माहिती व पाककृती यांची माहिती देण्यात येणार असून रानभाज्या व फळे याठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
लातूर येथे होणाऱ्या रानभाजी महोत्सवात जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे रानभाज्या व रानफळे उपलब्ध आहेत, अशा शेतकऱ्यांनी रान भाज्या व फळे विक्रीसाठी घेवून यावे. त्यांच्यासाठी विक्री व्यवस्थापन सोय करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी व इतर नागरिकांनी रानभाजी महोत्सवामध्ये सहभाग नोंदवून रानभाज्यांची माहिती घेवून खरेदी करण्याचे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक आत्मा एस. व्ही. लाडके यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment