संवेदनशील, प्रतिसादात्मक प्रशासनासाठी सर्वांनी कुटुंब म्हणून काम करावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
संवेदनशील, प्रतिसादात्मक प्रशासनासाठी सर्वांनी कुटुंब म्हणून काम करावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
• महसूल पंधरवडा अंतर्गत महसूल अधिकारी, कर्मचारी यांची कार्यशाळा उत्साहात
• पंधरवड्यात होणाऱ्या उपक्रमांबाबत क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन
• कार्यशाळेच्या उद्घाटनाचा मान कोतवाल, तलाठी, महसूल कर्मचारी संघटना पदाधिकाऱ्यांना
लातूर, दि. 02 (जिमाका) : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून सर्व शासकीय विभागांशी समन्वय ठेवून शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे काम महसूल विभाग करतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी महसूल विभाग जोडला गेला आहे. त्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक अर्ज, निवेदनाला कागद न समजता, त्यामागील मानवी चेहरा वाचून त्यावर योग्य आणि गतिमान निर्णय घेण्याची जबाबदारी प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याची आहे. यासोबतच प्रशासनाची ओळख संवेदनशील आणि प्रतिसादात्मक प्रशासन अशी होण्यासाठी सर्वांनी एक कुटुंब म्हणून मनापासून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
महसूल पंधरवडा अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्यशाळेत जिल्हाधिकारी बोलत होत्या. प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, सुशांत शिंदे, शरद झाडके, मंजुषा लटपटे, अविनाश कोरडे, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख, जिल्हा कौशल्य विकास सहायक आयुक्त बालाजी मरे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांच्यासह तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल सहायक, तलाठी, कोतवाल यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन नियोजित असतानाही त्यांनी पुढाकार घेत या कार्यशाळेला उपस्थित कोतवाल, तलाठी, महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून त्यांना कार्यशाळेच्या उद्घाटनाचा मान दिला.
लोकाभिमुख प्रशासन प्रणालीमध्ये महसूल विभागाची जबाबदारी महत्वाची असून प्रशासनातील मुख्य घटक म्हणून हा विभाग ओळखला जातो. या विभागातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी हा आपत्ती व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती यासारख्या अनेक आव्हानात्मक परिस्थितीत कशाचीही पर्वा न करता आपली जबाबदारी पार पाडतो. त्यामुळे नागरिकांच्या या विभागाकडून अनेक अपेक्षा असून या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. याचप्रमाणे महसूल पंधरवडा साजरा होत असताना विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून यामाध्यमातून महसूल विभागाच्या कामांसोबतच शासनाच्या विविध महत्वपूर्ण योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे आणि जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. या पंधरवड्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना यासारख्या योजनांच्या जनजागृतीसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
तहसीलदार, उपविभागीय कार्यालयात ‘महसूल लायब्ररी’
प्रशासकीय कामकाज सक्षमपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी मानसिक व शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपले आरोग्य, आहाराकडे लक्ष द्यावे. प्रत्येकाने दैनंदिन व्यायामाला महत्व द्यावे. यासोबतच सर्व तहसीलदार, उपविभागीय कार्यालयांमध्ये ‘महसूल लायब्ररी’ तयार करावी. यामुळे महसूल विभागात नव्याने येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना महसूल विभागाच्या कामकाजाची माहिती मिळेल आणि कामकाज अधिक अचूक होण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींचे स्वागत
महसूल पंधरवडा अंतर्गत 2 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत विविध उपक्रम राबविणे नियोजित होते. या योजनेतून लातूर जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास विभाग आणि कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकता केंद्रामध्ये 20 प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आल आहे. या सर्व प्रशिक्षणार्थींचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही सर्व युवकांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या योजनेतून युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार असून भविष्यात नोकरी मिळविताना या अनुभवाचा त्यांना लाभ होईल. त्यामुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थी यांनी चांगल्याप्रकारे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
महसूल पंधरवडा काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख, जिल्हा कौशल्य विकास सहायक आयुक्त बालाजी मरे, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे यांनी केले. नायब तहसीलदार गणेश सरोदे यांनी आभार मानले.
***
Comments
Post a Comment