केंद्रीय राखीव पोलीस दल भरती प्रशिक्षण संस्थेतील 30 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ उत्साहात
केंद्रीय राखीव पोलीस दल भरती प्रशिक्षण संस्थेतील
30 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ उत्साहात
· कॉन्स्टेबल जी. बी. एल. विग्नेस ठरले सर्वोत्कृष्ट प्रशिक्षार्थी
· गुणवंत प्रशिक्षनार्थींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
लातूर, दि. 06 (जिमाका) : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या लातूर येथील भरती प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थींच्या 30 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक तथा भरती प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अमीरुल हसन अन्सारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
लातूरचे डेप्युटी कमांडट (प्रशासन) सुदीप राजाराम वाकचोरे आणि असिस्टंट कमांडट, परेड कमांडर नरेंद्रसिग चौधरी मान्यवरांचे यांनी स्वागत केले. यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी, जवानांचे कुटुंबीय आणि लातूर जिल्ह्यातील विविध कार्यालये व शाळांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
देशातील विविध राज्यांमधून निवडलेले 119 नवीन हवालदार (6 महिलांसह) यांनी 22 आठवड्यांचे कठोर मूलभूत प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षित सैनिक म्हणून देशाच्या सेवासाठी स्वतःला समर्पित करण्यास तयार आहेत. प्रशिक्षण काळात या जवानांना शारीरिक प्रशिक्षण आणि नि:शस्त्र लढण्याव्यतिरिक्त, नक्षलवाद आणि दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी घात, घेराबंदी, शोध आणि छापे यासारख्या कार्यवाहीचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले आहे. विविध प्रकारची शस्त्रे वापरुन गोळीबाराचा सराव करण्यात आला आहे. विविध प्रकारची इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लनोझिव्ह उपकरणे आणि त्यांची यंत्रणा याविषयीही माहिती देण्यात आली आहे. त्यांना कायदेविषयक ज्ञान, जीवन वाचवणारे महत्वाचे आणि व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या लातूर येथील भरती प्रशिक्षण संस्थेतून आतापर्यंत एकूण 30 तुकड्यामध्ये 9 हजार 566 नवीन हवालदारांनी यशस्वीरित्या मूलभूत प्रशिक्षण घेतले आहे.
दीक्षांत समारंभाच्या समारोपाप्रसंगी पोलीस उपमहानिरीक्षक अमिरुल हसन अन्सारी यांनी 30 व्या तुकडील सर्व प्रशिक्षकांचे, विशेषत: ड्रिल आणि डब्ल्यूटी प्रशिक्षकांचे आणि सर्व नवीन राखीव कर्मचाऱ्यांचे हार्दीक अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. कर्तव्यनिष्ठेचे आणि देशसेवेचे उत्कृष्ट उदाहरण ते घालून देतील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी गुणवंत प्रशिक्षार्थींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी व रँक देवून गौरविण्यात आले. तसेच कॉन्स्टेबल जी. बी. एल. विग्नेस यांची सर्वोत्कृष्ट प्रशिक्षार्थी म्हणून निवड करुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. या समारंभात प्रशिक्षकांनी विविध प्रकारचे धाडसी प्रात्यक्षिके सादर केली.
****
Comments
Post a Comment