लातूर येथे भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर-क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

 लातूर येथे भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर-क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे


शेतकरी, महिला, युवा वर्गाच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय


लातूर, दि. 15 (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिक हा विकासाचा केंद्रबिंदू असून शेतकरी, महिला, युवा वर्गासाठी शासनाने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामाध्यमातून सर्व समाज घटकांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते.


प्रारंभी ना. बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, भारत कदम, अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सलीम शेख, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, जावेद शेख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते. 

  

नारी शक्तीच्या सन्मानासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून प्रत्येक पात्र महिलेला दरमहा दीड हजार रुपये म्हणजेच एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 3 लाख 85 हजार महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले ससून पात्र महिलांच्या बँक खात्यावर लवकरच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून पात्र महिलांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या 3 हजार 720 मुलींचे जवळपास 18 कोटी 47 लाख रुपयांचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफ होणार असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.


राज्यातील युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षित युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल. सहा महिन्यांच्या प्रशिक्षण काळात राज्य शासन दरमहा 6 ते 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. तसेच अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून मदत केली जात आहे. 2023-24 मध्ये इयत्ता दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या 11 हजार 935 विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेतून 43 कोटी 16 लाख रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून 5 हजार 665 विद्यार्थ्यांना 22 कोटी 65 लाख रुपये रक्कम अदा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.


मातंग समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाने अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच ‘आर्टी’ची स्थापना केली आहे. राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी जळकोट आणि रेणापूर येथे संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहे सुरु केली आहेत. त्यामुळे या मुलांचे शिक्षण अखंडितपणे सुरु राहण्यास मदत होणार असल्याचे ना. बनसोडे म्हणाले.


शेतकऱ्यांना वीज सवलत; कापूस व सोयाबीन उत्पादकांना अनुदान


शेतकरी बांधवांच्या साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या कृषीपंपाला मोफत वीज पुरविण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जाहीर केली आहे. जिल्ह्यात सुमारे 1 लाख 41 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल. जिल्ह्यात विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी विद्युत वितरण व्यवस्था बळकट केली जात आहे. नादुरुस्त विद्युत रोहित्र तातडीने बदलून मिळावे, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 200 रोहित्र खरेदीसाठी निधी देण्यात येणार असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.


गतवर्षीच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यातील 6 लाख 8 हजार शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे, असे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानातून 70 तलावातील सुमारे 37 लाख घनमीटर गाळ उपसा करण्यात आला. यामुळे पाणी साठ्यात 376 कोटी लिटरची वाढ झाली. हा गाळ 9 हजार 500 एकरावर पसरण्यात आला आहे. त्यामुळे शेती सुपीक बनण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.


वयोवृद्ध नागरिकांना सहाय्य साधने खरेदीसाठी मदत; तीर्थ दर्शनही घडविणार


वाढत्या वयामुळे वृद्धांना अशक्तपणा, दिव्यांगत्वाला सामोरे जावे लागते. यावर उपाययोजना करण्याकरिता 65 वर्षांवरील अशा नागरिकांना व्हीलचेअर, श्रवणयंत्र यासारखी उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत केली जाणार आहे. यासाठी शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली आहे. तसेच 60 वर्षांवरील नागरिकांना मोफत तीर्थक्षेत्र यात्रा घडविण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली असल्याची माहिती ना. बनसोडे यांनी दिली.


अंगणवाडीतील ‘वन स्टॉप सेंटर’ ठरतेय बालकांसाठी फायदेशीर


जिल्हा परिषदेने अंगणवाडीमध्ये ‘वन स्टॉप सेंटर’ सुरु करण्यात आली असून आरोग्य तपासणी, लसीकरण, समुपदेशन, बाळंतविडा वाटप या सारख्या सेवा देण्यात येत आहेत. त्यामुळे बालकांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे. तसेच 177 बालकांना असलेल्या दुर्मिळ आजारांचे वेळेत निदान होवून त्यांना संदर्भ सेवा देण्यात आली असल्याचे ना. बनसोडे म्हणाले. तसेच जिल्ह्यातील 13 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 8 आरोग्य वर्धिनी उपकेंद्रांना राष्ट्रीय गुणवत्तेचे मानांकन मिळाले आहे. आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळालेला लातूर हा राज्यातील एकमेव जिल्हा असल्याचे त्यांनी नमूद केले.


परिवहन विभागामार्फत उदगीर येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यात आले आहे. एमएच 55 क्रमांक असलेल्या या कार्यालयाद्वारे पाच तालुक्यांतील नागरिकांना सेवा दिली जाणार आहे. उदगीर येथे विविध समाजासाठी भवन, सभागृह उभारण्यात येत आहेत. तसेच उदगीर येथे नगरपालिकेने भव्य बुद्ध विहार उभारले आहे. या बुद्ध विहाराचे लवकरच लोकार्पण होणार असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.


जिल्ह्यातील क्रीडा सुविधांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न


जिल्ह्यातील क्रीडा सुविधांच्या बळकटीकरणासाठी 164 कोटी 13 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यातून लातूर विभागीय क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल आणि 6 तालुका क्रीडा संकुलांचा विकास केला जाणार आहे. तसेच मनरेगा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या 101 शाळांमध्ये क्रीडांगण विकास करण्यात येत असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. 


यावर्षी 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत महसूल पंधरवडा अभियानाद्वारे राज्य शासनाच्या योजनांचा प्रसार आणि प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. या उपक्रमामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख बनण्यास मदत झाली असल्याचे ना. बनसोडे म्हणाले. लातूर जिल्ह्यात वन क्षेत्र कमी असल्याने वृक्ष लागवडीसाठी जिल्हा प्रशासनाने ‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियान सुरु केले आहे. जून महिन्यापासून या अभियानामध्ये जवळपास 30 लाख वृक्ष लागवड झाली असल्याचे नमूद करून प्रत्येक कुटुंबाने किमान एक तरी झाड लावून लातूर जिल्हा हरित बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ना. बनसोडे यांनी यावेळी केले.


ध्वजारोहणानंतर राखीव पोलीस उपनिरीक्षक डी. डी. माने यांच्या पथकाने मानवंदना दिली. या कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांचा क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना विशेष सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल यावेळी त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच विविध योजना, उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, पुरस्कारप्राप्त खेळाडू, विद्यार्थी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले. 

***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु