खरीप पिकांवरील रोग, अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी उपाययोजना करण्याचे आवाहन
खरीप पिकांवरील रोग, अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
शेतकऱ्यांनी उपाययोजना करण्याचे आवाहन
लातूर, दि. 6 (जिमाका) : मागील पंधरा दिवसातील सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाची वाढ काही प्रमाणात जास्त झालेली आहे. जास्तीच्या कायीक वाढीमुळे या पिकात उंट अळी, तंबाखूवरील पाणी खाणारे अळी, हेलिकोवरपा आर्मी जेरा व त्यासोबतच चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव जिल्ह्यामध्ये आढळून येत आहे. या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे जाऊ नये, शेतकऱ्यांनी उपाययोजना करण्याचे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी 10 लिटर पाण्यामध्ये इमामेक्टिन बेण्झोयट 1.9 टक्के (8 मिली) किंवा क्लोरॅन्ट्री निलीप्रोल मिली आणि लॅम्बडा 04 मिली याप्रमाणे फवारावे. सोबतच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी टेब्युकोनॅझोल आणि सल्फर (20 ग्रॅम) किंवा मन्कोझेब आणि कार्बेन्डाझिम 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये फवारणी घ्यावी.
ज्या ठिकाणी अतिरिक्त कायीक वाढ झालेली असेल, त्या ठिकाणी लिव्होसीन 10 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. सोयाबीनची वाढ समाधानकारक असल्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे टॉनिक किंवा नत्रजन्य खताचा वापर या पिकामध्ये फवारणीसाठी करू नये. ज्या ठिकाणी पिवळा मोझॅईकची प्रादुर्भाव ग्रस्त झाडे आढळून येत आहेत, अशी झाडे त्वरित उपटून शेताबाहेर खड्डा घेऊन गढून टाकावीत. जास्तीच्या पावसाला तूर हे पीक संवेदनशील असल्यामुळे चराद्वारे जास्तीच्या पाण्याचा निचरा करावा. मर रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजणेसाठी जैविक बुरशीनाजके (ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स) प्रति एकरी 4 किलो या प्रमाणात 200 लिटर पाण्यामधून ड्रेन्चिंग द्यावी.
कापूस पिकावरील मावा, तुडतुड नियंत्रणासाठी फवारणी करावी
मावा व तुडतडे च्या नियंत्रणासाठी फ्लोनिकॅमीड 50 टक्के 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. कपाशी पिकात जास्तीच्या पावसामुळे मर लागली असेल तर कॉपर ऑक्सिक्लोराइड 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. बोंड अळीच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा व नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
मूग व उडीद या पिकांमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी बाविस्टीन 10 ग्रॅम व शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेण्झोयट 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.
*****
Comments
Post a Comment