मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
• जस्तीत जास्त युवकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
• उद्योजक, खासगी आस्थापांना मिळणार मनुष्यबळ
लातूर, दि. 08 (जिमाका) : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून राज्यातील शिक्षित युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे युवकांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगिता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, कौशल्य विकास सहायक आयुक्त बालाजी मरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख, नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सह आयुक्त रामदास कोकरे, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत युवकांना उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय तथा निमशासकीय आस्थापनांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याठिकाणी प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाल्यामुळे युवकांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक क्षमता निर्माण होईल. या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यांचा असून प्रशिक्षण काळात इयत्ता बारावी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार रुपये, आयटीआय, पदविकाधारक प्रशिक्षणार्थींना 8 हजार रुपये आणि पदवीधर, पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10 हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या योजनेसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमुळे उद्योजकांना मिळणार मनुष्यबळ
युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र यांनाही सहभागी होता येणार आहे. खासगी आस्थापना, उद्योग यांना या योजनेतून त्यांच्याकडील एकूण कार्यरत पदांच्या 20 टक्के प्रशिक्षणार्थी घेता येतील. या प्रशिक्षणार्थींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता विभागामार्फत विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात (डीबीटी) ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.
लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळ आणि विविध आस्थापना यांनी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवावी. अधिक माहितीसाठी लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 02382- 299462 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त बालाजी मरे यांनी यावेळी केले.
***
Comments
Post a Comment