महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सुधारीत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. 22 : राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्‍कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. याबाबत 31 जुलै 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 7 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्‍सवात राज्‍यातील उत्‍कृष्‍ट गणेशोत्‍सव मंडळांना राज्‍य शासनाकडून पुरस्‍कार देण्‍यात येणार आहे. यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्‍पर्धेत धर्मादाय आयुक्‍त यांच्‍याकडे नोंदणी केलेल्‍या किंवा स्‍थानिक पोलीस स्‍टेशन यांची किंवा स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था यांची परवानगी घेतलेल्‍या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. राज्‍यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या गणेशोत्‍सव मंडळाना अनुक्रमे 5 लाख रुपये, 2 लाख 50 हजार रुपये आणि 1 लाख रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्‍यात येणार आहे. तसेच राज्‍य समितीकडे 36 जिल्‍ह्यातील प्रत्येकी 1 याप्रमाणे 36 प्राप्‍त शिफारसीत गणेशोत्‍सव मंडळापैकी 3 विजेते गणेशोत्‍सव मंडळ वगळून उर्वरित 33 गणेशोत्‍सव मंडळांचाही राज्‍य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्‍यात येणार आहे. प्रत्‍येक जिल्‍ह्यातील गणेशोत्‍सव मंडळाची निवड करण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे. या स्पर्धेची माहिती आणि अर्ज करण्यासाठी http://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. या स्पर्धेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. ***

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा