जर्मनीस जाण्यास इच्छुक वाहनचालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे अर्ज करावेत

जर्मनीस जाण्यास इच्छुक वाहनचालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे अर्ज करावेत लातूर, दि. 22 : जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत 25 फेब्रुवारी 2024 रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्यामध्ये वाहन चालकांचा समावेश आहे. तरी जर्मनीमध्ये जाण्यासाठी इच्छुक वाहनचालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी केले आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 10 हजार कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाच्या अनुषंगाने यंत्रणा, प्रशिक्षण व्यवस्था व कार्यपद्धती निश्चित करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने यंत्रणा कार्यपद्धती व प्रशिक्षणाबाबत जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती गठित करण्यात आलेली आहे. कराराप्रमाणे बाडेन वुटेनबर्ग या राज्यास कुशल वाहनचालक पुरविण्यासाठी परिवहन विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने या प्रकल्पाअंतर्गत जर्मनीस जाण्यासाठी इच्छुक वाहनचालकांनी शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या क्युआर कोड (QR CODE) वर स्कॅन करुन त्यावर दिलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबतचा अर्ज भरावा. बाडेन वुटेनबर्ग या राज्यास कुशल वाहनचालक पुरविण्याच्या प्रकल्पाबाबत जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्ट चालक वाहन संघटना, तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांना अवगत करण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत उमेदवारास जर्मन भाषा येणे अनिवार्य आहे. तथापि जर्मन भाषा प्रशिक्षणाबाबतची कार्यवाही ही शासनामार्फत करण्यात येणार असून उमेदवाराचा सर्व खर्च हा शासन करणार आहे. जर्मनी व भारत या दोन्ही देशातील वाहनचालकांसाठी असलेले नियम व अभ्यासक्रम तसेच इतर अनुषंगिक यामध्ये तफावत असून उमेदवारास आवश्यक प्रशिक्षण देण्याबाबतची कार्यवाही व खर्च देखील शासनस्तरावरुन होणार आहे. लातुर जिल्ह्यामधील सर्व ट्रान्सपोर्ट वाहनचालक संघटना, मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटना व इतर वाहनचालकांना आवाहन करण्यात येते की, जर्मनी देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्यात सुरु असलेल्या नवनवीन प्रकल्पांतर्गत जर्मनीस जाण्यास इच्छुक असणाऱ्या वाहन चालकांनी अर्ज करावयाच्या प्रक्रियेबाबत क्यूआर कोडवर स्कॅन करून त्यावर दिलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबतच्या अटींप्रमाणे अर्ज भरुन सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु