उदगीर उप प्रादेशिक परिवहन कार्यालायचे ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन सर्वसामान्य नागरिक, वाहनधारकांची गैरसोय दूर होणार - क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे






 उदगीर उप प्रादेशिक परिवहन कार्यालायचे ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन

सर्वसामान्य नागरिक, वाहनधारकांची गैरसोय दूर होणार - क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे


लातूर, दि. ९ : उदगीर येथील उप प्रादेशिक परिवहनकार्यालयाचे आज उद्घाटन होत असून उदगीरकरांसाठी आज अतिशय आंनदाचा दिवस आहे. या कार्यालयामुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनधारक यांना परिहवन विभागाच्या सर्व सेवा उदगीर येथे उपलब्ध होणार असल्याने त्यांची गैरसोय दूर होईल, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.


उदगीर शहरातील लिंबोटी प्रकल्प उद्भव जलशुद्धीकरण केंद्र येथे नव्याने सुरु होत असलेल्या एमएच-५५ उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ना. बनसोडे बोलत होते. माजी आमदार गोविंद केंद्रे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, सर्जेराव भांगे, रामभाऊ तिरुके, शिवानंद हैबतपुरे, रामराव ऐनवाड, विजय निटूरे, दिपाली आवटे आदी यावेळी उपस्थित होते.


९ ऑगस्ट या दिवसाला ऐतिहासिक महत्व असून आजच्या दिवशी उदगीर येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु होत असून उदगीरच्या विकासातील हा महत्वाचा टप्पा आहे. अनेक दिवसांपासून हे कार्यालय उदगीर येथे सुरु करण्याबाबत मागणी होती. विविध मोटारवाहन चालक मालक आणि मॅकेनिकल संघटना यांनीही मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात उदगीर येथे विशेष बाब म्हणून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले. उदगीर येथे सुरु झालेल्या या कार्यालयामुळे उदगीर तालुक्यासह या कार्यालयाला जोडलेल्या सर्व तालुक्यातील नागरिकांना वाहन चालक परवाना, वाहन नोंदणी, त्याचे नूतनीकरण, वाहन तपासणी आदी सर्व सुविधा मिळणार आहेत. तसेच वाहनधारकांना आवश्यक कागदपत्रे काढण्याबाबत परिवहन विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करतील, असे त्यांनी सांगितले.


शासनाच्या महत्वपूर्ण योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचावा


राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिक, महिला, युवक, शेतकरी यांच्यासाठी अतिशय महत्वाचे निर्णय घेतले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आणि मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना यासारख्या महत्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती गाव-खेड्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहचवून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी उपस्थित नागरिकांना केले.


प्रारंभी क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे फीत कापून आणि कोनशीला अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच विविध मोटारवाहन चालक मालक संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.


*** 



Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा