‘मिशन साद’ आरोग्य तपासणी शिबिराचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन श्रवणदोषाच्या लवकर निदानासाठी प्रत्येक बालकाची आरोग्य तपासणी करून घ्यावी - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

‘मिशन साद’ आरोग्य तपासणी शिबिराचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन श्रवणदोषाच्या लवकर निदानासाठी प्रत्येक बालकाची आरोग्य तपासणी करून घ्यावी - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे लातूर, दि. २६ (जिमाका) : जिल्ह्यातील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील श्रवणदोष असलेल्या बालकांचा शोध घेवून, त्यांच्यावर वेळीच आवश्यक उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 'मिशन साद' हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत प्रत्येक बालकाची आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे केले. जिल्हा प्रशासन, उमंग इन्स्टिट्यूट आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन साद’ अंतर्गत आज प्रबोधनकार ठाकरे चौक येथील अंगणवाडीमध्ये तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख, नायब तहसीलदार गणेश सरोदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. लहान मुलांमधील श्रवणदोषाचे लवकर निदान होवून वेळीच उपचार झाल्यास या मुलांमधील श्रवणदोष दूर होवू शकतो. त्यामुळे शून्य ते सहा वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाची तपासणी करून घेण्यासाठी जिल्ह्यात अंगणवाडी स्तरावर ‘मिशन साद’ अंतर्गत आरोग्य तपसणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनी आपल्या क्षेत्रातील प्रत्येक बालकाची तपासणी करून घेण्यासाठी पालकांना मार्गदर्शन करावे, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यावेळी म्हणाल्या. तसेच पालकांनी आपल्या मुलांमध्ये श्रवणदोष दिसून येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य तपासणी आणि उपचार करून घ्यावेत. लवकर उपचाराने हा दोष दूर होतो, असे त्यांनी सांगितले. आरोग्य तपासणीसाठी बालकांना घेवून आलेल्या पालकांशी जिल्हाधिकारी यांनी यावेळी संवाद साधला. तसेच आरोग्य तपासणी कार्यपद्धतीची माहिती जाणून घेतली. शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. उमंग इन्स्टिट्युटच्या आरोग्य तपासणी मोबाईल युनिटची त्यांनी पाहणी केली. लातूर शहर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकर भारती, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रिया तारु, उमंग इन्स्टिट्यूटचे प्रकल्प संयोजक किरण उटगे , व्यवस्थापक, श्रीहरी गोरे, रामेश्वर जाधव, स्पीच ॲन्ड ऑडिओलॉजीस्ट तज्ज्ञ डॉ. श्रीशैलम तलारी, डॉ. विरेश मायनाळे, डॉ. वैभव उटगे, डॉ. प्रगती रामटेके, मानसशास्‍त्रज्ञ गणेश डोंगरे, ऑक्युपेशनल थेरपीस्टडॉ. अर्जुन राठोड, डॉ. अदिती सोळंके, फिजिओथेरपीस्ट डॉ. शिवानी पाटील यावेळी उपस्थित होते. ***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु