पावसाळ्यात जलजन्य, कीटकजन्य आजारांपासून बचावासाठी अशी घ्या काळजी !
विशेष लेख
पावसाळ्यात जलजन्य, कीटकजन्य आजारांपासून
बचावासाठी अशी घ्या काळजी !
सध्या जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असून पावसाच्या पाण्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होवून कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ, अतिसार, हगवण, विषमज्वर, पोलिओ इत्यादी जलजन्य तसेच साठलेल्या पाण्यात डासांची पैदास झाल्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या इत्यादी किटकजन्य आजराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात जलजन्य व किटकजन्य आजारांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पुढीलप्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे.
नागरिकांनी पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे अथवा निर्जंतुकीकरणासाठी मेडीक्लोरचा वापर करावा. बाहेरील असुरक्षित पाणी पिण्यासाठी वापरु नये. घराबाहेर पडताना घरचे निर्जंतुकीकरण केलेले पाणी सोबत घ्यावे. पिण्याचे पाणी साठविण्यासाठी तोटीच्या टाकाचा वापर करावा अथवा पिण्याच्या पाण्याचे भांडे लहान मुलांच्या हाताला येणार नाही, अशा उंचीवर ठेवावे. पाणी घेण्यासाठी वोगराळ्याचा वापर करावा. पिण्याच्या पाण्यात हात बुडविल्यास हातावरील रोगजंतू पाण्यात मिसळून पाणी दूषित होवू शकते. रोगजंतू प्रामुख्याने तळहातावर व नखाखाली असतात. त्यामुळे हात साबणाने स्वच्छ धुवावेत व नखे नियमित कापावीत. पावसाळ्यात माशांचा प्रादुर्भाव जास्त होत असल्याने घरातील अन्न पदार्थांवर माशा बसू नयेत, यासाठी पालकांनी दक्षता घ्यावी.
जास्त पिकलली, सडलेली फळे खाऊ नयेत. उघड्यावर ठेवलेल्या भाज्या घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवूनच त्याचा वापर करावा. पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. हॉटेलमध्ये उघड्यावर ठेवलेले व शिळे अन्न पदार्थ खाऊ नयेत. गाड्यावरील कापून ठेवलेली फळे खाऊ नयेत. कारण त्यावर माशा आणि धूळ बसून ती रोगजंतूंनी दूषित झालेली असू शकतात. तसेच फळांचा ज्यूस बनवितांना निर्जंतुक पाणी न वापरल्यास जलजन्य आजाराची लागण होऊ शकते.
हॉटेल व्यावसायिकांनी व अन्न पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांनी अन्न पदार्थ उघड्यावर न ठेवता ते काचेच्या कपाटात ठेवावेत अथवा जाळीदार झाकणाने झाकून ठेवावेत. अन्न पदार्थावर माशा बसणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच पिण्यासाठी निर्जंतुक कलेले पाणी ग्राहकांसाठी उपलव्ध करावे, पाणी माठे उघडे ठेवू नये, हॉटेलमधील स्वयंपाकी व वेटर्स यांची वैयक्तीक स्वच्छता हाताची नखे कापलेली असणे, हात साबणानं स्वच्छ धुणे इत्यादी बाबींकडे हॉटेल मालकांनी लक्ष द्यावे. शौचास जावून आल्यानंतर व जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावेत, हात धुताना साबणाचा फेस होईपर्यंत दोन्ही बाजूनी स्वच्छ धुवून घ्यावे. शौचासाठी शौचालयाचाच वापर करावा. उघड्यावर शौचास बसल्याने मलाद्वारे पिण्याचे पाणी दूषित होते. तसेच त्यावर माशा बसून अन्नपदार्थ दूषित होतात. दूषित पाण्यामुळे लहान मुले अथवा वृद्धांना संडास उलटीचा त्रास झाल्यास त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन तीव्र स्वरुपाची जलशुष्कता निर्माण झाल्याने मृत्यू होवू शकतो. अशावेळी त्यांना त्वरित जवळच्या शासकीय दवाखान्यात दाखल करून औषधोपचार करावा.
किटकजन्य आजारांबाबत घ्यावयाची काळजी
साचलेल्या शुद्ध पाण्यात अथवा गढूळ पाण्यात डासांची पैदास होते. त्यामुळे साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा करावा. वापरात नसलेल्या कुलरच्या टाक्या, जुने टायर्स, बकेट, नारळाच्या करवंट्या, छतावरील अडगळ इत्यादीमध्ये साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. त्यामुळे हे त्वरित हटवावे. सर्व पाण्याच्या टाक्या, भांडे आठवड्यातून एकदा स्वच्छ करून कोरडा दिवस पाळावा. सायंकाळी विशेषतः 6 ते 8 च्या दरम्यान डास घरात प्रवेश करतात, या काळात दारे खिडक्या बंद ठेवाव्यात. दारांना व खिडक्यांना स्टेनलेस स्टील अथवा नॉयलॉन जाळ्या बसवून घ्याव्यात. झोपताना मछरदानीचा वापर करावा. सेप्टिक टँकच्या व्हेंट पाईपला नॉयलॉनची जाळी बसवावी. गच्चीवर असलेल्या भंगार वस्तूंमध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. कोणताही ताप अंगावर काढू नका. कोणत्याही प्रकारचा ताप आल्यास नजीकच्या शासकीय दवाखान्यात जावून तपासणी करावी आणि औषधोपचार घ्यावा. स्वतः हून कोणत्याही आजारावर उपचार करणे टाळावे.
*****
Comments
Post a Comment