मुख्यमंत्री ‘भावा’शी राज्यातील लाडक्या बहिणींचा संवाद; लातूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती



लातूर, दि. १५ : कालपासून (दि. १४ ऑगस्ट) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची तीन हजार रुपये इतकी एकत्रित रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. आजपर्यंत राज्यातील सुमारे ८० लाख भगिनींच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले असून या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधीक स्वरूपात दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त करताना, मी आता मुख्यमंत्र्यांची बहीण आहे...अशी नवीन ओळख निर्माण झाल्याचे सांगत मनमोकळेपणाने आपल्या मुख्यमंत्री भावाशी संवाद साधला. लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथूनही काही लाभार्थी महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

जिल्ह्यातील अनेक महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत. यापैकी काही महिला आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

यावेळी मनोगत व्यक्त करताना चिंचोली राववाडी येथील शेतमजुरी करणाऱ्या उषा सगर म्हणाल्या की, आमच्या सारख्या शेतमजुरी करणाऱ्या महिलांना अनेकदा इतरांकडे पैशासाठी हात पसरावा लागत होता. मात्र, आता प्रत्येक महिन्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दीड हजार मिळणार असल्याने फार मोठी मदत होणार आहे. ही योजना सुरु केल्याबद्दल आम्ही शासनाचे आभारी आहोत. याच गावातील शेतमजुरी करणाऱ्या हलीमा अजीज सय्यद यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार बँक खात्यात जमा झाल्याबद्दल शासनाचे आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या पैशामुळे मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या खर्चासाठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उदगीर तालुक्यातील लोहारा येथील रहिवासी आणि सध्या लातूर येथे राहत असलेल्या स्वाती सुडे यांनी सांगितले की, शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मी शिवण क्लास पूर्ण केला आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशातून मी नवीन शिलाई मशीन घेणार आहे. यातून स्वतःचा शिलाईचा व्यवसाय सुरु करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

लातूर येथील अश्विनी खंदाडे यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा झाल्याचे सांगून आनंद व्यक्त केला. तसेच या पैशामुळे घर खर्चासाठी फार मोठी मदत होणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आणि शासनाचे आभार मानून पाखर सांगवी येथील सीमा नंदगवळी यांनी या योजनेतून दरमहा जमा होणाऱ्या रक्कमेतून नवीन शिलाई मशीन घेणार असल्याचे सांगितले.

लातूर येथील अनिता बेंबडे, सरोजनी देशपांडे यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी अतिशय चांगली असून ही योजना सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा