·
कोणी करणार मुलांच्या शिक्षणासह त्यांच्या उज्ज्वल
भविष्यासाठी गुंतवणूक;
तर काहींच्या मनात स्वतःचा छोटेखानी
व्यवसाय सुरु करण्याची इच्छा
·
संसाराला हातभार लागणार असल्याने मोलमजुरी करणाऱ्या
महिलांमध्ये समाधान
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाचं नियोजन समिती सभागृह आज
सकाळपासूनच महिलांनी गजबजून गेलं होतं. निमित्त होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण
योजनेच्या शुभारंभानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमाचं. महिलांना
आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणाऱ्या या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास १४ ऑगस्टपासूनच
सुरुवात झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची एकत्रित ३ हजार रुपये रक्कम
महिलांच्या खात्यावरही जमा झाली आहे. त्यामुळं अतिशय आनंदी वातावरणात जिल्ह्यातील
महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यापैकी काहींशी संवाद साधला असता या
योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेतून मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची, संसाराला हातभार
लावण्यासाठी छोटा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच ही योजना
सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
अजित पवार आणि राज्य शासनाचे आभार मानले.
घर-संसार चालविताना काटकसर करून पैशांची बचत करण्याचं कौशल्य
महिलांकडे असतं. या बचत केलेल्या पैशातून कुटुंबासाठी काहीतरी करावं, यासाठी
त्यांची धडपड असते. पण आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा दीड हजार
रुपये त्यांचा खात्यावर जमा होणार आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अनेक
महिलांच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याची एकत्रित तीन हजार रुपये रक्कम जमाही
झाली आहे. या रक्कमेसह यापुढे दरमहा मिळणाऱ्या पैशातून आपण काय करणार आहोत, याचे
नियोजनही या महिलांनी करून ठेवलं असल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवले.
नागलगावच्या सुनिता कांबळे यांनी आपल्या
खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार
मानले. आता दरमहिन्याला जमा होणारी रक्कम साठवून घरीच छोटेखानी भाजीपाला विक्रीचा
व्यवसाय सुरु करणार आहे. त्यामुळे कुटुंबाच्या खर्चाला हातभार लागेल, असे त्यांनी
सांगितले. तसेच यावेळी काही महिलांनी स्वतःचा शिवणकाम व्यवसाय सुरु करण्यासाठी
नवीन शिलाई मशीन खरेदी करणार असल्याचेही सांगितले.
वांजरखेडा येथील मजुरी करणाऱ्या शामल
जाधव यांनीही या योजनेमुळे कुटुंबाला मोठा हातभार लागणार असून ही योजना सुरु
केल्याबद्दल शासनाचे आभार मानले. अशीच भावना मोलमजुरी करणाऱ्या इतरही महिलांनी
व्यक्त केली.
चिंचोलीच्या पूजा मुंडे म्हणाल्या,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दोन महिन्याचे तीन हजार रुपये खात्यात जमा
झाल्याचा मोबाईल संदेश आल्यावर खूप आनंद झाला. यापुढेही दर महिन्याला दीड हजार
रुपये माझ्या बँक खात्यात जमा झाल्यावर त्यापैकी एक हजार रुपये माझ्या मुलीच्या
नावे काढलेल्या सुकन्या योजनेच्या खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे भविष्यात
तिच्या शिक्षणाला हे पैसे उपयोगी ठरतील. पेठ येथील अश्विनी भोसले यांनीही या योजनेतून
मिळणाऱ्या पैशामुले आपल्या मुलींना चांगले शिक्षण देण्यासाठी मदत होणार असल्याचे
सांगितले. तसेच पिंपळगाव येथील दिपाली पिसाळ यांनीही या योजनेच्या पैशाचा उपयोग
मुलीच्या शिक्षणासाठी करणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य शासनाचे आभार मानले.
गाधवड येथील प्रतीक्षा क्षीरसागर ह्या
सध्या पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत आहेत. हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक
खर्चाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पैशांचा उपयोग होईल. त्यामुळे
कोणत्याही आर्थिक अडचणींशिवाय माझं शिक्षण पूर्ण होण्यास या योजनेची मदत होईल, असे
भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Comments
Post a Comment